नागपुरातील वर्धा रोडवरील साई मंदिरातील प्रकार
नागपूर: वर्धा रोडवरील साई मंदिरातून दानस्वरूपात आलेल्या चांदीच्या ४७ मौल्यवान वस्तू गायब झाल्याची माहिती शुक्रवारी पुढे आली आहे. साईबाबा मंडळाचे सचिव शेगावंकर यांनी २ डिसेंबर, २०१७ रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात एक निवेदन देऊन याबाबत माहिती दिली होती. गायब झालेल्या वस्तुंमध्ये चांदीचे दिवे, चांदीची बिस्किटे, चीप, पिसारा, चांदीच्या विटा, ११ तोळे चांदी आणि साईबाबांच्या चांदीच्या मुकुटाचा समावेश आहे.
सहायक धर्मदाय आयुक्तांनी ५ सप्टेंबर, २०१८ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार मंदिरातील मौल्यवान वस्तुंचे व्हॅल्युएशन करण्यात आले होते. यावेळी साईबाबा मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्र देशमुख, अविनाश शेगांवकर, दीपक बोरगांवकर यांनी मंदिराच्या स्ट्राँग रूममध्ये ४७ चांदीच्या वस्तू नसल्याने त्याचे व्हॅल्युएशन करण्यात आलेले नाही, अशी माहिती दिली.
या मौल्यवान वस्तु नेमक्या कुठे गायब झाल्या? याबाबत कुणाकडेही ठोस माहिती नाही. नवीन विश्वस्तांकडून कामाची सूत्रे स्वीकारताना स्ट्राँगरूममधील उपलब्ध वस्तूंची माहिती घेतली जाते. असे न केल्यास वर्तमान संचालक यासाठी जबाबदार असतात.