तीन दिवसीय छत्तीसगडी लोककला महोत्सवाचे थाटात उद्घाटन : पहिल्याच दिवशी ‘शिर्डी के साईबाबा’
नागपूर: संस्कृती, कला आणि खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तित्व, नेतृत्व विकसित होते. ‘लोककला’ ही आमची संस्कृती आहे. या लोककलेची ओळख विद्यार्थ्याना करून दिली नाही तर आमची भावी पिढी मोबाईलमध्ये गारद होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगर पालिकेच्या वतीने पूर्व आरटीओ कार्यालयालगतच्या डिपती सिग्नल मंडई मैदानावर तीन दिवसीय छत्तीसगडी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार कृष्णा खोपडे, महोत्सवाचे संयोजक स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, लकडगंज झोन सभापती राजकुमार सेलोकर, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर बहिरीनबाई सोनबोई, नगरसेवक अनिल गेंडरे, नगरसेविका चेतना टांक, सरिता कावरे, माजी नगरसेवक सेवाराम साहू, महेंद्र राऊत उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, छत्तीसगडी लोककला संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अनेकता मध्ये एकता हीच आमची विशेषता आहे. नागपुरात मराठी लोककला महोत्सव होतो तसाच छत्तीसगडी महोत्सवही होतो, ही या शहराची विशेषता आहे. कलेचा आणि कलावंतांचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे. पूर्व नागपुरातील अशा दुर्लक्षित मैदानांचा वापर जर अशा कार्यक्रमांसाठी होत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट नाही. पुढील वर्षी खासदार सांस्कृतिक महोत्सवातील एक कार्यक्रम डिपटी सिग्नल मैदानावर घेण्याचे ना. गडकरी यांनी यावेळी जाहीर केले. आता आपण खासदार उद्योग महोत्सव जाहीर केला असून पूर्व नागपुरातही अशा महोत्सवाचे आयोजन करून किमान पाच हजार युवकांना स्वयंरोजगाराची दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार कृष्णा खोपडे यांनी आपल्या भाषणातून पूर्व नागपूरच्या विकासाची गाथा सांगितली. एकेकाळी गलिच्छ असलेला डिपटी सिग्नलचा आज इतका विकास झाला की जमिनीचे भाव वधारले आहे. पहिल्यांदा अशा प्रकारचे आयोजन करून मनपाने सांस्कृतिक विकासही साधला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रास्ताविकातून संयोजक आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी महोत्सवामागील भूमिका विषद केली.
तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून ना. नितीन गडकरी यांनी कार्यक्रमाचे विधीवत उदघाटन केले. सर्व नगरसेवकांनी यावेळी ना. नितीन गडकरी यांचा सत्कार केला. संचालन सादिक कुरेशी यांनी केले. आभार नगरसेविका चेतना टांक यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शिर्डी के साईबाबा’चे सादरीकरण
कार्यक्रमानंतर संस्कार मल्टीसर्व्हिसेस प्रस्तुत आसावरी तिडके निर्मित ‘शिर्डी के साईबाबा’ या हिंदी माहानातट्याचे सादरीकरण झाले. १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत प्रख्यात छत्तीसगडी लोककलावंताच्या कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे.