तहसील पोलिसात गुन्हा दाखल
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोन क्र. ६ अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या बांधकाम साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यास गेलेल्या उपद्रव शोध पथकावर आरोपीने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला आणि जिवे मारण्याची धमकी दिले. यासंदर्भात एनडीएस प्रमुख विरसेन तांबे यांच्यासह पथकातील इतर सदस्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
गनी खान असे आरोपीचे नाव असून ज्योती नगर, धोंडबा चौक, शीतला माता समाजभवन जवळ येथील रहिवासी आहे. त्याचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडले असल्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ते उचलले नसल्याने एनडीएसचे पथक आज सकाळी ११ वाजता कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले गनी खान पथकाच्या अंगावर धावून आला आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
यासंदर्भात पथकातील सदस्यांनी एनडीएस प्रमुख विरसेन तांबे यांना माहिती दिली. आणि पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच गनी खान तेथून पसार झाला. यानंतर पथकातील सदस्यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम १८६,५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मनपाचे अपर आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी ही माहिती दिली.