भारतात नेत्रविकार असलेले असंख्य रुग्ण आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सर्वच लोकांना परवडत नाही. त्यामुळे भारतीय नेत्रतज्ञांनी संशोधन, नवीनता तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कामगिरी करावी व आपल्या संशोधनाचा लाभ सर्वसामान्य गरजू लोकांना करून द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
ऑल इंडिया ऑफ्थाल्मोलॉजिकल सोसायटी या नेत्रविकारतज्ञांच्या संस्थेचे वैज्ञानिक प्रकाशन असलेल्या ‘इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थाल्मोलॉजी’च्या प्रकाशनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पोस्टल स्टॅम्प व आवरणाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
वैज्ञानिक प्रकाशन काढणे आणि त्याहीपेक्षा ते सातत्याने ६० वर्षे चालविणे अतिशय कठीण काम असते, असे सांगून जर्नलच्या माध्यमातून डोळ्यांच्या विकाराबद्दल तज्ञ डॉक्टरांचे नवनवीन संशोधन जगापुढे यावे व त्यातून जगाला भारताची संशोधनातील महानता दिसावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
आपल्या देशात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. अलीकडच्या काळात नेत्रविकार चिकित्सेवर देशात चांगले संशोधन झाले आहे. त्यामुळे संस्थेचे वैज्ञानिक प्रकाशन प्रतिष्ठेचे मानले जाते असे संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. महिपाल सिंह सचदेव यांनी सांगितले. नेत्रदान चळवळ, नेत्रविकार तसेच मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार यांबद्दल समाजात अधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्राचे पोस्ट मास्तर जनरल एच.सी. अगरवाल, सोसायटीचे मावळते अध्यक्ष डॉ. एस. नटराजन, उपाध्यक्ष डॉ. बरुन नायक, महासचिव डॉ. नम्रता शर्मा, डॉ. ललित वर्मा तसेच संपादक डॉ. संतोष होनावर आदि उपस्थित होते.