Published On : Thu, Feb 27th, 2020

२१ सार्वजनिक शौचालयांच्या प्रस्तावांवर महापौरांचे शिक्कामोर्तब

महापौर निधीतून होणार बांधकाम : काही शौचालयांमध्ये तृतीयपंथियांसाठीही व्यवस्था

नागपूर : जनतेसोबतच्या संवाद कार्यक्रमातून समोर आलेल्या सूचनेवरून संपूर्ण महापौर निधीतून शहरातील विविध भागात सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्याचे ठरविल्यानंतर दहाही झोनमधून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यापैकी २१ प्रस्तावांवर महापौर संदीप जोशी यांनी शिक्कामोर्तब केले असून लवकरच या कामांचे भूमिपूजन होईल, असे त्यांनी जाहीर केले.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत २१ सार्वजनिक शौचालयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर प्रवीण दटके, स्थापत्य समितीचे सभापती अभय गोटेकर, उपसभापती किशोर वानखेडे, उपायुक्त महेश मोरोणे, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, अमीन अख्तर, धनंजय मेंढुलकर, राजेश भूतकर, सहायक आयुक्त हरिश राऊत, विजय हुमने, राजू भिवगडे, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, अशोक पाटील उपस्थित होते.

यावेळी महापौर संदीप जोशी यांनी झोनतर्फे पाठविण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या जागांचा झोननिहाय आढावा घेतला. यापैकी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कृपलानी टी-पॉईंट, दैनिक हितवाद कार्यालयासमोर, भेंडे ले-आऊट (लंडन स्ट्रीट), सेंट्रल बाजार रोड, धंतोली झोन कार्यालयाच्या बाजूला, धरमपेठ झोनअंतर्ग़त आर.टी.ओ. गेटजवळ, जिल्हा परिषद परिसर, रामनगर प्रवेशद्वाराच्या मागे रामनगर चौक, हनुमाननगर झोनअंतर्गत मानेवाडा चौक, रेशीमबाग ग्राऊंड, म्हाळगीनगर चौक सत्यम अपार्टमेंटच्या बाजूला, धंतोली झोनअंतर्गत शेतकरी भवनजवळ, गणेशपेठ पेट्रोल पंपजवळ, नेहरूनगर झोनअंतर्गत दिघोरी पुलाखाली, सतरंजीपुरा झोनअंतर्गत दही बाजार, लकडगंज झोनअंतर्गत मेहता काट्याजवळ, महाराणी लक्ष्मीबाई चौक पारडी बाजार, आशीनगर झोनअंतर्गत वीट भट्टी कळमना रोड, बाल वाचनालय आणि मंगळवारी झोनअंतर्गत मंगळवारी बाजार सदर, लिबर्टी सिनेमाजवळ अशा २१ प्रस्तावांवर शिक्कामोर्तब कऱण्यात आले.

नऊ झोनने एकूण ५२ जागांचे प्रस्ताव सादर केले होते. तर गांधीबाग झोनमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत एकही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. ५२ प्रस्तावांपैकी ३१ जागांवरचे प्रस्ताव काही कारणांमुळे जागांची उपलब्धता होण्यात अडचणी येत असल्यामुळे बारगळण्यात आले. त्यासंदर्भात पूर्ण कार्यवाही झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. गांधीबाग झोनमध्ये दोन जागा माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी सुचविल्या. त्या जागांची शहानिशा करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले.

विशेष म्हणजे, मंजूर करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी महत्त्वांच्या चौकातील आणि परिसरातील शौचालयांमध्ये तृतीयपंथियांसाठी विशेष व्यवस्था करण्यात याव्या, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.

Advertisement