Representative Pic
नागपूर : जगभरात कोरोना व्हायरसने हैदौस घातल्यानंतर राज्यातही कोरोना फोफावत चालला आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईनंतर आता देशाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.
नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा रुग्ण तीन दिवसांपूर्वी अमेरिकेहून नागपुरात आला होता. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालात कोरोना व्हायरस झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहे. हे 10 जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
कोरोना व्हायरसबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. राज्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. पॉझिटिव्ह रुग्णं आहेत पण ते गंभीर नाहीत. एक ग्रुप परदेशातून राज्यात आला होता. त्यातून हे 10 रुग्ण आढळले. या ग्रुपमधील व्यक्तींचा ज्यांच्याशी संबध आला आहे. त्यांच्याही तपासणी सुरू आहे. यात दोन जण मुंबईतील आहे तर 8 जण हे पुण्यातील रुग्ण आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आता रात्री नागपूरमध्ये आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे.