कुही तालुक्यातील चिकना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल बबन बिसने (४९) रा. इतवारी पेठ, उमरेड यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नागपूर: कुही तालुक्यातील चिकना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल बबन बिसने (४९) रा. इतवारी पेठ, उमरेड यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आर्थिक चणचणीतून ही आत्महत्या झाल्याचे बोलले जात आहे. उमरेड परिसरातील सेव मार्गावर असलेल्या विहीरीत उडी मारून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
सोमवारी रात्री पत्नी सुहासिनी हिला मित्राकडे पार्टी करायला जातो असे त्यांनी सांगितले होते. सुनिल रात्री घरी परतले नाही. सकाळपासूनच पत्नी आणि कुटुंबियांनी विचारपूस सुरू केली. त्यानंतर सर्वत्र शोधाशोधही सुरू झाली. अशातच सेव मार्गावरील धर्मराज हजारे यांच्या मालकीच्या विहिरीलगत एक चप्पल आणि चष्मा आढळून आला. सुनिल यांचे मित्र लोकनाथ निकोसे यांनी तातडीने सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे गाठून ही माहिती दिली. लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचले. लोखंडी गळ टाकण्यात आले. १०.३० वाजताच्या सुमारास त्यांचे प्रेत लोखंडी गळाला लागले. उमरेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले. सुनील बिसने हे मनमिळावू आणि अनेकांसाठी मार्गदर्शक होते. त्यांनी अशापद्धतीने आपली जीवनयात्रा संपवावी, यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मंगळवारी कुही मार्गावरील आमनदी स्मशानभूमीवर अंत्यविधी पार पडला. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त बोरसरे, तारणा बीटचे नायक पोलीस कॉस्टेबल हरीश यंगलवार करीत आहेत.