नागपूर: बुधवार दिनांक २५ मार्च रोजी रात्री आणि २६मार्चच्या पहाटे आलेल्या पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागातील खंडित झालेला वीजपुरवठा महावितरण कडून सुरळीत करण्यात आला आहे.
सध्या कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना महावितरणच्या वतीने तात्काळ पावलं टाकत खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.वीज पुरवठा सुरळीत करतेवेळी कर्मचारी तोंडावर मास्क लावून करीत असल्याचे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी ५.४० च्या सुमारास घाटरोड येथील वीज वाहिनीत बिघाड झाला.यामुळे मोक्षधाम,एसटी बसस्थानक, गणेश पेठ येथील वीजपुरवठा खंडित झाला.तसेच उंटखाना वीज वाहिनीवर रात्री ११वाजता बिघाड झाला.हा बिघाड ३०मिनीटात दूर करण्यात आला.
बिनाकी उपविभागीतील कुंदनलाल गुप्ता नगरात वीज वाहिनीवर रात्री ११.३० वाजता झाड पडले.वीज वाहिनीची तपासणी करीत असताना २ पिन इन्सुलेटर वीज चमकल्या मुळे निकामी झाले होते.गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
कांग्रेस नगर, धंतोली, रामदासपेठ येथील परिसरात छत्रपती नगरातील वीज उपकेंद्र मधून वीजपुरवठा होतो.यात रात्री १०.३०वाजता बिघाड झाला.तातडीने येथील भार हिंगणा उपकेंद्र कडे वळता करण्यात आल्याने १५ मीनीटात येथील वीजपुरवठा सुरळीत झाला. मुसळधार पावसामुळे अजनी येथील रोहित्रात ठिणग्या उडाल्या.अजनी शाखा कार्यालयातील कर्मचार्यानी धाव घेऊन बिघाड दुरुस्त केला.
वर्धमान नगर येथील एका कारखान्याजवळ पिन इन्सुलेटर खराब झाला.रात्रीची वेळ असल्याने या परिसरात दुसरीकडून वीजपुरवठा करण्यात आला.आज सकाळी इन्सुलेटर बदलण्यात आले. मोहपा, कोहळी, नरखेड येथे वीज चमकल्याने खराब झालेले पिन इन्सुलेटर आज बदलण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्यात येत आहे.