मनपाच्या देखरेखीत सुरू आहे समाजकार्य : अनेक संस्थांचा पुढाकार
नागपूर : रस्त्यावर जीवन कंठणाऱ्या नागरिकांची लॉकडाऊन दरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिकेने विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने बेघर निवारा सुरू केले असून यामधील सुमारे ४६३४ आणि ज्यांना अन्नाची सोय नाही अशा सुमारे चार हजार अशा एकूण आठ हजारांवर नागरिकांची भोजनाची व्यवस्था केली आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यावरील नागरिकांसाठी मनपाकडे सध्या असलेल्या बेघर निवाऱ्याच्या धर्तीवर शहरात विविध ठिकाणी बेघर निवारे उभारण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली. नागपूर महानगरपालिकेने आपल्या नियमित बेघर निवाऱ्यासह दहाही झोनमध्ये एकूण १८१ निवारे विविध ठिकाणी तयार केली आहेत. तर नागपूर मेट्रोने ३६ निवारे उभारली आहेत. या निवा-यांची क्षमता ६८०६ आहे. यासोबतच नागपूर महानगरपालिकेने २० कम्युनिटी किचन तयार केले असून या स्वयंपाकघरातून दररोज बेघर निवाऱ्यातील नागरिकांना भोजन पुरविण्यात येते. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रोने उभारलेल्या बेघर निवाऱ्यांमध्ये सध्या ५४२० नागरिक वास्तव्यास आहेत. याव्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, ज्यांना खरंच अन्नाची आवश्यकता आहे अशा शहरातील सुमारे चार हजार लोकांनाही कम्युनिटी किचनमधून चार हजार लोकांना भोजन पुरविण्यात येत आहे. अशा एकून १८७ ठिकाणी अन्नदान सुरू आहे. विशेष म्हणजे या बेघर निवाऱ्यांमध्ये असलेल्या नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पापडकर यांच्यासह मेडिकलची चमूही कार्यरत आहे.
समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ
बेघरांना आणि रेशन कार्ड नसलेल्या अन्नदान करण्यासाठी धार्मिक आणि समाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ येत आहे. यासोबतच मोठ्या कंपन्याही मदतीसाठी सरसावल्या आहेत. मॉईलने भोजनासाठी आवश्यक कच्चा माल पुरविला असून यासाठी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यासोबतच ग्रुप ऑफ नागपूर फ्रेंडस-माँ, पॉवर ऑफ वेलफेअर, दि इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ लॉयन्स क्लब,ऋणानुबंध फाऊंडेशन, अन्न अमृत फाऊंडेशन, इस्कॉन, जागरण फाऊंडेशन, जलाराम मंदिर ट्रस्ट, छत्तरपूर फॉर्मस, लाफ्टर क्लब आदी संस्था भोजन पुरविण्यात मदत करीत आहेत.
समाजसेवी संस्थांनी पुढे यावे : आयुक्त
लॉकडाऊनमध्ये ज्या संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत, त्यांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आभार मानले आहे. शहरातील अन्य समाजसेवी आणि धार्मिक संस्थांनी पुढे येऊन अशा लोकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. यासाठी उपायुक्त डॉ. रंजना लाडे (मो. ९७६५५५०२१४) आणि आयुक्त (राजस्व) मिलिंद मेश्राम (९८२३३३०९३४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रीन व्हिजील आणि पोस्टल विभागची जनजागृती
शहरात बेघरांसाठी उभारलेल्या निवाऱ्यांमध्ये ‘कोरोना’चा प्रसार टाळण्यासाठी काय-काय काळजी घ्यायची, याबद्दल ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि पोस्टल विभागाचे कर्मचारी जाऊन जनजागृती करीत आहेत. तेथे असलेल्या नागरिकांना काय-काय काळजी घ्यायची, काय नियम पाळायचे याबाबत माहिती देऊन शासन, प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करा, कोरोनाला हद्दपार करा, असे आवाहन करीत आहे.
दृष्टिक्षेपात मदत
मनपाने उभारलेले बेघर निवारा : १८१
मनपाच्या बेघर निवाऱ्यातील नागरिकांची क्षमता : ४५०७
मेट्रोने उभारलेले बेघर निवारा : ३६
मेट्रोच्या निवाऱ्यात असलेले नागरिक : २२९९
कम्युनिटी किचनची संख्या : २०
नागरिकांना अन्नदान : ८०००