बावनकुळे यांची मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांकडे मागणी
नागपूर: कोरोना महामारीचा प्रकोपामुळे संपूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत सरकारने लॉक डाऊन वाढवले आहे. अशा स्थितीत आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबे वीज बिल भरू शकणार नाही. त्यामुळे शासनाने 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या गरीब ग्राहकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना एक पत्र पाठवून केली आहे. अनेक कुटुंबाची या काळात उपासमार होत आहे. ते कुटुंब वीज बिल कोठून भरणार? शून्य ते 300 युनिट वीज वापरणारे ग्राहक हे आर्थिक गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये मोडतात. अशा कुटुंबानाच या काळात दिलासा देणे आवश्यक आहे. यामुळे शासन आपल्या पाठीशी आहे, असे या लोकांना वाटून परिस्थितीशी झगडण्यास त्यांच्यात हिम्मत येईल. शासनाने ही मागणी त्वरित मान्य करावी अशी विनंतीही बावनकुळे यांनी केली आहे.