नागपूर : परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी जरीपटका आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन महिलासह पाच जणाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०० लिटर हातभट्टीची दारू, एक ओटो आणि दोन दुचाकी असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
लॉकडाऊनमुळे सध्या सर्व दारूची दुकाने बंद असल्याने हातभट्टीच्या दारूला मोठी मागणी आहे. त्यामुळे हातभट्टीची दारू गाळणारे आणि विकणारे भल्या पहाटेपासूनच ठिकठिकाणच्या विक्रेत्यांना हातभट्टीची दारू नेऊन पोहोचवतात. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांचे पथक आज सकाळी ५ वाजता पासून जरीपटका आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत होते.
त्यांना जरीपटक्यातील इटारसी पुलाजवळ एक ऑटोचालक संशयास्पद अवस्थेत दिसला. त्याला विचारपूस केली असता तो घाबरला. त्यामुळे पोलिसांनी ऑटोची तपासणी केली असता त्यात ४० लिटर मोहाची दारू आढळली. प्राथमिक चौकशीत आरोपी ऑटोचालक विकास भीमराव जांभुळकर, त्याची पत्नी रिना विकास जांभुळकर आणि आरती आकाश मेश्राम (वय २६ , रा. मोठा इंदोरा) हे तिघे गावठी दारूची तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिघांना पोलिसांनी अटक केली.
काही वेळानंतर पाचपावलीतील रहिवासी अक्षय सिद्धार्थ मंडपे हा एका स्कुटीवरून दारूची तस्करी करताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून पोलिसांनी १० लिटर मोहाची दारू आणि स्कूटी जप्त केली. या कारवाईनंतर कपिलनगरात संजय रामचंद्र डोंगरे (वय ३२) या भिवसनखोरीतील दारू तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० लिटर दारू आणि दुचाकी असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशाप्रकारे या पाच आरोपींकडून पोलिसांनी १०० लिटर मोहाची दारू, एक ऑटो आणि दोन दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे नायक विनोद सोनटक्के, चेतन जाधव, मृदुल नगरे अशोक दुबे आणि रवींद्र राऊत यांनी ही कामगिरी बजावली.