मीटर वाचन,बिल प्रिंटींगला सुरूवात
नागपूर: नागपूर शहर आणि ग्रामीण सह वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी ग्राहकांचे मीटर वाचन करण्याबरोबरच वीज बिलाचे प्रीटींग करून ते वितरीत करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मार्च-२०२० पासून ग्राहकांचे मीटर वाचन बंद करण्याबरोबरच वीज बिलाचे प्रीटींग आणि वितरणही बंद करण्यात आले होते. या काळात ग्राहकांना अचूक बिलासाठी महावितरण मोबाईल अँप डाऊन लोड करून स्वतः मिटर वाचन पाठवायचे आवाहन केले होते,ज्या ग्राहकांचे मीटर वाचन मिळाले नाही त्यांना मागील वीज बिलाच्या आधारे सरासरी वीज बिल देण्यात आले आणि वीज बिल एसएमएस व्दारे ग्राहकांना पाठविण्यात येत होते.
महाराष्ट्र सरकारच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार महावितरण मुख्य प्रशासनाने जारी केलेल्या निर्देशाच्या अधिन राहून सोशल डिस्टंन्सिंग नियमाचे काटेकोर पालन करत, वीज ग्राहकांना आपल्या वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटर वाचन,बिल प्रीटींग आणि वीज बिलाचे वितरण करण्यात येणार आहे. मीटर वाचन आणि वीज देयकाचे वाटप करण्याऱ्या कर्मचाऱ्यांनी हॅंड ग्लोज,चेहऱ्यावर मास्क बांधणे ,सोबत सॅनिटाईजर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना वीज देयकाचे पैसे भरणे सोयीचे जावे यासाठी वीज बिल भरणा केंद्र सुरु करणे तसेच वीज ग्राहकांना अचूक वाहनाचे देयक देऊन त्याचे वाटप करण्यासाठी महावितरणने स्थानिक प्रशासनाकडे लेखी परवानगी मागितली होती. स्थानिक प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र काम करण्याची परवानगी महावितरणला दिली आहे.
यामुळे महानगर पालिकेच्या वतीने जो भाग कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे त्या भागात मीटर वाचन अथवा वीज देयकाचे वितरण होणार नाही. असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.