रामटेक: रामटेक-तुमसर महामार्गावर शनिवारी (१३ जून) दुपारी एक वाजताच्या सुमारास हॉटेल शिकाराजवळ नागपूर येथील कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारमधील तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
सध्या राज्यात व नागपूर शहरात कोरोना संक्रमण सुरू असताना मागील दोन अडीच महिन्यांपासून शहरात व ग्रामीण भागात लॉकडाऊन असताना काही दिवसांपूर्वीच शहर व ग्रामीण भागात शिथिलता दिल्यामुळे शहरातील काही पर्यटनप्रेमी रामटेक शहराकडे पर्यटनाकरिता कोरोना संक्रमणाची पर्वा न करता फिरायला येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशाचप्रकारे शनिवारी नागपुरातील सचिन हरिभाऊ धांडे (वय ३३, रा. भरतनगर, नागपूर) हा नितू सुरेशसिंग चौव्हान (वय २४, रा. भवानी मंदिरमागे पारडी, नागपूर) हे कार क्र. एम.एच. ३१/डी. सी. ३५३३ ने दोघेही रामटेक येथील खिंडशी जलाशय येथे फिरायला आले होते.
नागपूरला परत जात असताना रामटेक-तुमसर राज्य महामार्गाचे चौपदरी रस्ताचे काम सुरू असल्याने रस्ता खराब झाला आहे. काल पाऊस बर्यापैकी झाल्याने पावसामुळे अधिकच खराब झाला आहे. अशात रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात सचिन गाडी चालवत होता. गाडी वेगात होती व रस्ता खराब असल्यामुळे कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. गाडी पलटी खात एका मोठय़ा दगडावर आदळली.
यात नितूच्या डोक्यावर दगड लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर सहकार्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पार्थिव उतरीय तपासणीकरिता रवाना केले. तसेच कारचालक सचिन हरिभाऊ धांडे याच्याविरोधात कलम २७८, ३0४, अ, मो.वा.का. अँक्ट १८४ अन्वये गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले.