नागपूर: अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात येणार असून बन्सोड कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार, असे ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. मृतकाच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी ते आज जलालखेडा तालुक्यातील पिपळधरा येथे आले होते.
27 मे रोजी अरविंद बन्सोड यांना मारहाण झाली व नंतर त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्र्यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला यांना दिले. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपायुक्त सामाजिक न्याय डॉ. सिद्धार्थ गायकवाड व सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी मृतक अरविंदचे वडील जनार्दन बन्सोड व भाऊ किशोर व धीरज यांच्याकडून घटनेची तपशीलवार माहिती घेतली.
या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती पालकमंत्र्यांनी या भेटीत दिली. या प्रकरणाची योग्य चौकशी करुन बन्सोड कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे बन्सोड कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी, अशा सूचना डॉ. राऊत यांनी सामाजिक न्याय विभागाला दिल्या. अतिरिक्त मदतीसाठीचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन नवी दिल्ली या संस्थेला पाठवावा असेही ते म्हणाले.
बन्सोड कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून या प्रकरणात निश्चित न्याय मिळेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.