Published On : Sat, Jul 18th, 2020

नाला आणि गडरलाईनवरील अतिक्रमणावर होणार मोठी कारवाई!

Advertisement

मनपा आयुक्तांचे निर्देश : दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी ठरतोय मोठा अडथळा

नागपूर: नागपूर शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्‌भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असून लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती मोठ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्के घर बांधणे, गडरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडतं आणि घरांमध्ये शिरतं.

नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० च्या आसपास आल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यास लक्षात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहिमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

अतिक्रमण काढा नाहीतर कारवाई!
नैसर्गिक प्रवाह अडविण्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरु लागले आहे. अतिक्रमण हा त्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे ज्यांनी गडरलाईनवर, नाल्यांवर जेथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement