भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे जिल्हाधिका-यांमार्फत केंद्रीय विदेश मंत्र्यांना निवेदन
नागपूर : पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मर्दान जिल्ह्यातील तख्तबई तालुक्यात शेतात सापडलेली तथागत भगवान बुद्धांची मूर्ती खंडित करण्यात आलेला प्रकार विकृत आणि विध्वंसक मानसिकता दर्शविणारा आहे. या प्रकरणाची आवश्यक चौकशी करून भारत सरकारच्या वतीने पाकिस्तान सरकारकडे अशा विचार विकृती विरुद्ध तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा नागपूर महानगरपालिकेचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हाधिका-यांमार्फत केंद्रीय विदेश मंत्र्यांना केली आहे.
यासंदर्भात ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष अशोक मेंढे, सतीश शिरसवान, ॲड.राहुल झांबरे, उमेश पिंपरे, मनीष मेश्राम, रोहन चांदेकर, धनंजय कांबळे आदी उपस्थित होते.
पाकिस्तानातील मर्दान जिल्ह्यातील तख्तबई तालुक्यात शेतात खोदकामादरम्यान विश्व शांतीचे प्रणेते तथागत भगवान बुद्धांची मूर्ती सापडली. मात्र ही मूर्ती गैरइस्लामिक ठरवून खंडित करण्यात आली. यासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये काही मूर्तीवर घनाने घाव घालत असल्याचे दिसून येत आहेत. हा प्रकार अत्यंत विकृत मानसिकता दर्शविणारा आहे. यासंबंधी भारत सरकारने आवश्यक चौकशी करावी तसेच मूर्ती सापडलेले ठिकाणही संरक्षित करावे व बुद्धांची ‘ती’ मूर्ती पाकिस्तानवासीयांना हवी नसल्यास भारताच्या स्वाधिन करण्याची मागणी भारत सरकारच्या वतीने करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे भाजपा प्रदेश सचिव तथा नागपूर महानगरपालिकेचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या घटनेवर देशातील कथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षातील लोकांनी मौन साधने किंवा प्रतिक्रिया टाळणे हे अत्यंत आश्र्चर्यजनक असल्याचेही ते म्हणाले.
खैबर पख्तूनख्वा पाकिस्तानातील अफगानिस्तानच्या सीमेवर आहे. या क्षेत्राचा इतिहास २००० वर्ष जूना आहे. इसवीसन पूर्व सातमध्ये हा भाग गांधार नावे प्रचलित होता. इसवीसन पूर्व २०० मध्ये येथे बौद्ध धर्म लोकप्रिय होता. मौर्यांच्या पतनानंतर कुषाणांनी हा भाग त्यांची राजधानी बनविली. ११ व्या शतकात येथे पहिल्यांदा इस्लाम धर्म पोहोचला.