Published On : Fri, Jul 24th, 2020

कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सकाळीच दौरा : प्रथम सीओसी मधून ट्रेसिंग नंतर प्रत्यक्ष धडक

नागपूर: नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. २४) सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

Gold Rate
Friday 31 Jan. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आयुक्त तुकाराम मुंढे सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालयात पोचले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्र पाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जवाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे ‍निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने मा. आयुक्तांनी निलंबित केले.

सीओसी मधून पाहणी, नंतर प्रत्यक्ष भेट
यानंतर मनपा आयुक्त यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली.

तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये आशीनगर झोन क्रमांक ९ चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

Advertisement