Published On : Tue, Jul 28th, 2020

आम्ही सर्व आरोग्य यंत्रणेच्या पाठिशी!

Advertisement

महापौरांसह खासदार, आमदारांनी दिला विश्वास : मेयो, मेडिकलमध्ये जाऊन जाणून घेतली व्यवस्थेची माहिती

नागपूर : कोव्हिड-१९ या महामारीविरुद्ध गेल्या चार महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा जिकरीने लढा देत आहे. त्यांच्या अडचणी आम्हाला ठाऊक आहे. या परिस्थितीत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून हवी असेल ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आपण आवाज द्या. आम्ही धावून येऊ, असा विश्वास देत महापौर संदीप जोशी यांच्यासह खासदार आणि आमदारांनी मेयो आणि मेडिकलमधील अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची माहिती घेतली आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठिशी उभे आहोत, असा विश्वास दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारात आणि नेतृत्वात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे यांनी सोमवारी (ता. २७) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन कोव्हिड-१९ संदर्भात असलेल्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली आणि अडचणीसुद्धा जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई होते. प्रारंभी त्यांनी मेयो रुग्णालयाला भेट दिली. प्रारंभी मेयोतील कोव्हिड हॉस्पीटलला जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर अधिष्ठाता कक्षात झालेल्या बैठकीत व्यवस्था आणि अडचणी जाणून घेतल्या. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. सागर पांडे यांनी सध्या मेयोमधील व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली. आतापर्यंत मेयोमध्ये १७४० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ५५० बेडची व्यवस्था असून ग्रामीणमधील रुग्णांचाही भार वाढत असल्याने भविष्यात बेड कमी पडू शकतात, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशाच्या आधार घेत नागपूर महानगरपालिकेने लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवाय आमदार निवास, व्हीएनआयटी, वनामती, सिम्बॉयसीस आणि पाचपावली विलगीकरण केंद्राचे रुपयांतर कोव्हिड केअर सेंटरमध्ये केल्याने २२०० बेडची व्यवस्था झाली आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होईल, अशी माहिती डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली. शिवाय काही खासगी रुग्णालये आणि हॉटेल्समध्येही अशा रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी मेडिकल रुग्णालयाला भेट दिली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांच्यासह अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. तिरपुडे, डॉ. गोसावी ह्यांनी मेडिकलमध्ये कोव्हिड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची आणि व्यवस्थेची माहिती दिली. मेयोमध्ये कोव्हिड रुग्णांसोबतच अन्य रुग्णांचाही भार वाढला असल्याने बेडची कमतरता भविष्यात भासू शकते. शिवाय नागपूर शहराव्यतिरिक्त नागपूर ग्रामीण आणि नागपूर व अमरावती विभागातील सर्व शहरे यासोबतच मध्यप्रदेशातील काही शहरातील रुग्ण सरळ येत असल्याने मेडिकलचा ताण वाढत चालला आहे. लक्षणे नसलेली रुग्ण अधिक प्रमाणात येत असल्याने पेच निर्माण झाला होता. परंतु आता मनपाने नव्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्यान असल्याने मेडिकलचा भार बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे ते म्हणाले.

अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांनी सांगितले की, अमरावती विभागातील अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत येथे येतात. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या १७ गरोदर माता मेडिकलमध्ये दाखल आहेत. त्यात ७ महिलांची प्रसूती झाली. अशी अनेक आव्हाने समोर आहेत. असे असतानाही संपूर्ण चमू निकराने आणि जिकरीने लढा देत असल्याचे ते म्हणाले.

‘बेस कॅम्प’ची संकल्पना उत्तम
सरळ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण असावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात मुंबई आणि पुणे शहराच्या धर्तीवर ‘बेस कॅम्प’ तयार केले तर रुग्णालयांवरील भार बराचसा कमी होईल. जो कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल किंवा लक्षणे असतील त्याने सर्वप्रथम बेस कॅम्पमध्ये जावे. तेथून त्याला कुठल्या रुग्णालयात न्यायचे, लक्षणे नसतील आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याला गृह विलगीकरणात ठेवायचे की अन्यत्र कुठे न्यायचे यासंदर्भात तेथील यंत्रणा निर्णय घेईल. मेडिकलचे अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांनी मांडलेली ही संकल्पना महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी उचलून धरली. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

महापौरांनी केले संपूर्ण चमूचे कौतुक
मेयो आणि मेडिकलची संपूर्ण यंत्रणा पहिल्या दिवसापासून कोव्हिडशी लढा देत आहे. त्यांचे काम सर्वोत्तम आहेत. हेच खरे सैनिक आहे, असे म्हणत सर्व चमूचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यात स्वयंसेवी संस्थांची मदत हवी असेल तर तसे सांगा. अन्य कुठलीही मदत सांगा. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या मदतीसाठी सज्ज आहोत. मेडिलकमध्ये प्रस्तावित हेल्पडेस्क तातडीने सुरू करायचा असेल आणि तेथेही स्वयंसेवकांची आवश्यकता असेल, ५०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था हवी असेल तर ते सुद्धा करून देण्यास महापौर संदीप जोशी यांनी तयारी दर्शविली. स्वयंसेवकांना कोव्हिडशी कसे लढायचे हे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून प्रतिबंधित क्षेत्र किंवा रुग्णालयात त्यांची मदत घेता येईल, अशी सूचनाही त्यांनी मांडली. अन्य लोकप्रतिनिधींनीही काही सूचना करीत आवश्यक ती सर्व मदत करु, असा विश्वास दिला.

Advertisement