– क्रीडा समितीच्या बैठकीत ठराव : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपुर – नागपूर महानगरपालिकेची क्रीडा विशेष समितीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणा-या खेळाडूंना इंडोअर तसेच बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन खेळाचा सराव करण्याची परवानगी देण्याचा ठराव केला आहे.
क्रीडा विशेष समितीची बैठक गुरुवारी (ता. १३) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत सभापती श्री. प्रमोद चिखले, सदस्य सुनील हिरणवार, सरला नायक, कांता लारोकर, नेहा वाघमारे उपस्थित होते.
सभापती श्री.प्रमोद चिखले यांनी सूचना केली की, बॅडमिंटन खेळाडू कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिन्यापासून या खेळाच्या सरावापासून वंचित आहेत. या खेळाडूंना कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमाचे पालन करुन सराव करण्याची परवानगी देण्यात यावी. याबाबतचे निवेदन आयुक्तांमार्फत महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला.
शासनाने आर्चरी, अथलॅटिक्स, ज्म्पींग, थ्रोईंग, गोल्फ, लॉन टेनिस, शुटींग, बॅडमिन्टन (आऊट डोअर), मलखांब, जिमॅस्टीक (आऊटडोअर) या खेळांच्या सरावाकरीता परवानगी दिली आहे. या खेळासोबतच कोविड-१९ संदर्भात असलेल्या शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर इनडोअर बॅडमिंटन खेळण्यास परवानगी द्यावी, असे प्रस्तावात नमूद करण्याचे निर्देश सभापती प्रमोद चिखले यांनी दिले.
सभापती चिखले यांनी मनपाचे सर्व क्रीडा संकूल व स्टेडियम मधील दुरुस्ती, विज, पाणी, सॅनिटाइजेशन व इतर सुविधांबाबतचा अहवाल १५ दिवसाचे आत सादर करण्याचे निर्देश दिले.
या नंतर क्रीडा विशेष समितीच्यावतीने मनपा शाळांतील दहावी वर्गामधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा महापौर श्री. संदीप जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौरांनी समीर जांभुळकर, भारती नगरारे, संगीता हुमणे, दीप्ती हर्षे, तृप्ती दुबे, निशा नाज सादिक, आलिया बानो सादिक, सादेका खातून मो.अली आणि अंशारा मुनिबा यांचा दुपट्टा आणि शैक्षणिक उपयोगाच्या वस्तु देऊन सत्कार केला.
यावेळी आमदार प्रवीण दटके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, परिवहन समिती सभापती नरेंद्र बोरकर, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, श्रीमती सरला कमलेश नायक, कांता लारोकर, नेहा वाघमारे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, अन्न छत्र फाऊंडेशनची अरुणा पुरोहित यांनी पण विद्यार्थ्यांचा सत्कार केला. महापौरांनी सुप्रिया चटर्जी, लान टेनिसची अम्बेसेडर, आंतरराष्ट्रीय पटू यांचा पण सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन पियुष आंबुलकर यांनी केले तर आभार भोळे यांनी व्यक्त केले.