नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरूवारी (ता.३) पाचपावली कोव्हिड केअर सेंटर, पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सुतीकागृहला आकस्मिक भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.
शहरात कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचणीची संख्या आणि वेग वाढविने आवश्यक आहे. या उद्देशाने मनपा आयुक्तांनी शहरातील कोव्हिड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली. मात्र यासोबतच चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जात आहे अथवा नाही, निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का, चाचणी करण्यास येणा-या नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेतले जाते का, या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी आकस्मिक भेट दिली.
कोव्हिड केअर सेंटर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सुतीकागृहमध्ये चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे गरजेचे आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलेल्यांचे जलद पद्धतीने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करण्यासाठी ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तैनात करण्यात आली आहे. या टिमने आपली कार्यपद्धती वेगवान करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची लवकरात लवकर चाचणी केली जावी, असे निर्देश यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील कोणतीही लक्षणे आढळल्यास लपवू नये. त्वरीत आपल्या जवळच्या चाचणी केंद्रात चाचणी करून घ्यावी. याशिवाय आपल्या संपर्कातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे लक्षात येतात स्वत:च जबाबदारीने मनपाच्या कोव्हिड चाचणी केंद्रातून चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी केंद्रीय कॉल सेंटरवर फोन करून मार्गदर्शन घ्यावे. यासाठी 0712-2551866, 0712-2532474, 18002333764 हे कॉल सेंटरचे क्रमांक आहेत. आपल्याला रुग्णालयात दाखल व्हायचे असेल आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर 0712-2567021 या क्रमांकावर कॉल करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.