महापौर संदीप जोशी यांचे शहरवासीयांना आवाहन
नागपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब आहे. आज प्रत्येकाने जबाबदारीची वागणूक ठेवून स्वतःची सुरक्षा घ्यायची आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. शनिवार (ता.५) आणि रविवार (ता.६) दोन दिवस नागपूर शहरात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची मागणी जनप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. सोशल मीडियावरही ‘जनता कर्फ्यू’ लागू होत असल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘जनता कर्फ्यू’ संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतिही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी या शनिवारी (ता.५) व रविवारी (ता.६) स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे. कोरोनाला हरविण्यासाठी आपणा सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढच होत आहे. सुरूवातीलाच ‘आयसीएमआर’ आणि इतर सरकारी एजन्सींनी सप्टेंबर महिन्यात कोव्हिडचा धोका वाढण्याचा इशारा दिला होता. मनपातर्फे चाचणी केंद्रही वाढविण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.३) शहरातील सुमारे ६ हजार नागरिकांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. यापैकी १७५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वारंवार शासकीय दिशानिर्देश जारी केले जात आहेत. नागरिकांनी मास्क लावावे, सॅनिटायजरचा वापर करावा, फिजिकल डिस्टंनसिंग राखावे असे आवाहन केले जाते. मात्र काही लोक वगळता बहुतांशी नागरिक दिशानिर्देशांचे पालन करीत नाही. यासंदर्भात गुरूवारी (ता.४) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. शासनाच्या दिशानिर्देशांच्या पालनासंदर्भात आता मनपाने अधिक कठोरतेने कारवाई सुरू केली आहे. आजपासून मनपाच्या उपद्रव शोध पथकाने मास्क न लावणाऱ्यांविरोधातील कारवाईला गती दिली आहे, असेही महापौरांनी सांगितले.
शहरातील कोव्हिडचा वाढता धोका लक्षात घेता जनप्रतिनिधींद्वारे ‘जनता कर्फ्यू’ची मागणी करण्यात आली. ‘जनता कर्फ्यू’च्या भीतीने लोक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. हे धोकादायक आहे. आज आपली प्रत्येकाची सुरक्षा आपल्या स्वतःच्याच हातात आहे. त्यामुळे प्रत्येकाने शहराप्रती आणि विशेषतः आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वयंस्फूर्तीने व स्वयंशिस्तीने शनिवार आणि रविवार हे दोन दिवस घरातच राहावे. मनपातर्फे कुणावरही दंडात्मक कारवाईची वेळ येऊ नये, सर्वांनी काटेकोरपणे दिशानिर्देशांचे पालन करावे. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्व कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे पालन करून घरीच राहण्याचा संकल्प करूया, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.