नागपूर : उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलिसांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी कुपलवाडी येथे धाड घालून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक केली.
आरपीएफला मंगळवारी मस्जिद ख्वाजा बंदे नवाज नगर कुपलवाडी प्लॉट क्रमांक १२० बासोदा नगर येथे ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफ न या ठिकाणी धाड घातली. यावेळी संशयित शकील अहमद रियाजुद्दीन (३८) यास अटक करण्यात आली.
त्याने त्याच्या मोबाईलवरून तीन वेगवेगळ्या वैयक्तिक ई-मेल आयडी तयार केल्या. त्यानंतर तो २०० ते ३०० रुपयांचे कमिशन घेऊन ग्राहकांना रेल्वेचे ई-तिकीट विक्री करीत होता. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्याने तीन आयडीवरून एकूण ११ तिकीट बुक केले. त्याची किंमत ३१ हजार ६८ रुपये आहे.
या तिकिटावर प्रवास झाला आहे तर आणखी दोन तिकीट त्याने काढले. त्यावर अजून प्रवास व्हायचा आहे. त्याची किंमत २६६० रुपये आहे. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरील आरपीएफच्या ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध तिकीट काळाबाजारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक उपनिरीक्षक सी. बी. अहिरवार यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला.