कोवीड -१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आता ‘मिशनमोड ‘वर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच समाजमाध्यमाव्दारे राज्यातील जनतेला याची माहिती दिली आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून सुरु झालेली ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम आता १० ऑक्टोबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यभर यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्धी मोहीम राबविली जात आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विशेषत्वाने प्रयत्न करत आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देखील या संदर्भात जबाबदारी सोपविण्यात आली आहे नागपूरसाठी पालकमंत्री पालकमंत्री डॉ. नितीन लक्ष ठेवून आहेत. या मोहिमेच्या प्रथम फेरीमध्ये वैद्यकीय पथके आपल्या भागात आपल्या घरी येऊन भेटी देणार आहेत. या भेटीमध्ये घरातील प्रत्येक सदस्याची अँपमध्ये नोंद घेतली जाणार आहे. तसेच इन्फ्रारेड थर्मामीटरने आपल्या शरिरातील तापमान मोजले जाईल. त्यानंतर तापमान तसेच पल्स ऑक्सिमिटरने शरिरातील ऑक्सीजन पातळीची नोंद घेतली जाणार आहे. नागरिकांनी या तपासणी मोहिमेदरम्यान या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता हा लढा कोण्या एका व्यक्ती, संस्था, सरकार असा न राहता प्रत्येकाचा झाला असून यापुढे पुढे प्रत्येकाला यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. ताप असलेल्या आपल्या कुटूंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शासन यंत्रणेकडे ठेवली जाणार आहे. या शिवाय या प्रथम फेरीमध्ये आलेल्या वैद्यकीय पथक घरातील मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार अवयव प्रत्यारोपण तसेच दमा आदी आजारांची माहिती ते नागरिकांकडून घेणार आहेत.
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी”
मार्चपासून महाराष्ट्रात प्रवेश करुन प्रचंड वेगाने पसरलेल्या कोविड-19 विषाणूने आता प्रादुर्भाव केला आहे. त्याला रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, आणि वैद्यकीय सेवेत अहोरात्र झटणारे डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
प्रसंगी आपला जीवाची पर्वा न करता, येणा-या प्रत्येक रुग्णाच्या तपासणीपासून तो बरा होईपर्यंत, आपले प्रयत्न सुरु ठेवत आहेत. यातील अनेकजण अगदी अबालवृद्ध बरे होऊन सुखरूप घरी पोहचले आहेत. तर काहीजणांना दुर्दैवाने प्राणास मुकावे लागले आहे, लागत आहे. बाधित प्रत्येक रुग्ण बरा होऊन सकुशल घरी जावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. त्यात प्रामुख्याने मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरीत करणे, आरोग्य शिक्षण साधने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-19 चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जनजागृती करणे या बाबी सदरील मोहिमेत राबविल्या जाणार आहेत.
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जिवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसूत्रीवर आधारित असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे, याबाबतचे महत्त्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिले जाणार आहे.
वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने- ग्रामीण भागातील आठवडी बाजार-मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी तसेच सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी या बाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमेव्दारे देण्यात येणार आहे.
‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची व्याप्ती
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाईल. या मोहिमेंतर्गत सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे इत्यादी मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
प्रत्येक नागरिकाने रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. मास्कचा सदैव वापर करावा, मास्क काढून ठेवूच नये, याबाबत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविषयी काळजी घ्यावी. एकमेकांचे सतत प्रबोधन करावे.
कामानिमित्त घराबाहेर पडत असल्यास सॅनिटाझरची लहान बाटली घरीदारी सदैव सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा. हाताची नियमितपणे स्वच्छता राखावी. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावेत.
पुरेसा आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योग, प्राणायम आदीव्दारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी. जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ जेवणात असावेत.
कुटुंबात वावरतांना कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे, शासन प्रशासन तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करावे. घरातील लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात उपयोग करावा. निदान कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे या काळात नातेवाईक-मित्रांकडे जाणे टाळावे.
बाजारपेठेत खरेदीला जाताना काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर पाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा.
कार्यालयात शक्यतो सुरक्षित अंतर ठेवूनच बैठक व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांना शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय द्यावा. लिफ्टचा कमीत कमी वापर करावा.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असताना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये. सार्वजनिक वाहनात एक आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे. वाहनांमध्ये गर्दी करून दाटीवाटीने प्रवास करू नये. गर्दीचा प्रवास टाळावा. कमीत कमी ठिकाणी स्पर्श करावा.
या सर्व बाबी जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर लस सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून कोरोना साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी होऊन शासन व प्रशासनाला सहकार्य करणे सर्वाच्या हिताचे आहे. चला तर… एका जागरूक समाजाचा भाग बनूया, आणि कोरोनाला हद्दपार करूया.
प्रभाकर बारहाते,
संचालक माहिती कार्यालय, नागपूर