नागपूर: राज्यात कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य ववस्था आणि पोलीस व्यवस्था कामाला लागली असताना नागपुरात मात्र धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या जीवाची काळजी न करता नागरिकांच्या हितासाठी काम करणाऱ्या पोलिसांवर काही गुंडानी जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांनी चाकू हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जीवघेण्या हल्ल्यामध्ये रवी चौधरी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वेळीच उपचार मिळाल्याने ते सुखरूप असल्याचं सांगण्यात येत आहे. पण जर शहरातल्या पोलिसांवर असा जीवघेणा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न समोर येत आहे.
कन्हानमधील गौरहिवरा चौकावरची काल रात्री 9 वाजताची ही घटना आहे. ड्यूटीवर असताना काही अज्ञात गुंड तिथे आले आणि त्यांनी रवी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेल्याची माहिती देण्यात आली आहे. उपस्थित स्थानिकांनी नागरिकांनी तात्काळ रवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि पोलीस स्थानकात यासंबंधी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वाळू चोरी करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे हल्लेखोरांनी अशा प्रकारे बदला घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, चाकूने केलेले वार हे खोलवर असल्यामुळे रवी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आरोपींचा शोध घेत असल्यांचं सांगण्यात आलं आहे.