पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून अभिजीत वंजारी की आशीष देशमुख?
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पक्षीय उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून प्रत्येक पक्ष युवा उमेदवाराला संधी देण्याच्या विचारात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. काँग्रेसतर्फे अभिजीत वंजारी अथवा आशीष देशमुख यांचा विचार होऊ शकतो तर भाजपतर्फे विद्यमान महापौर संदीप जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे
भाजपचे प्रा. अनिल सोले यांनी या मतदारसंघाचे यापूर्वी नेतृत्व केले. १८ जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. कोव्हिडमुळे निवडणूक जाहीर झाली नव्हती. मात्र आता सर्वत्र अनलॉक झाले. बिहारच्या निवडणुकाही जाहीर झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका, पोटनिवडणूक आता कधीही जाहीर होऊ शकते.
या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. प्रा. अनिल सोले यांच्या ऐवजी नव्या व्यक्तीला संधी मिळावी असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठीही याच मताचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नवा चेहरा कोण, यावर चर्चा सुरू झाली असून नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर संदीप जोशी हे युवा आणि संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांचा कामाचा धडाका मोठा आहे आणि सामाजिक कार्याचा व्यापाही मोठा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासातील म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी ना. गडकरी यांच्या स्वप्नातील अनेक प्रकल्पासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून सत्यात उतरविण्याचा दिशेने पाऊल टाकले. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे स्थायी समिती सभापती होण्याचा मान संदीप जोशी यांना मिळाला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि आताही त्यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी संदीप जोशी यांच्याकडेच होती आणि आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून मागील तीन वर्षांपासून नागपुरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी संदीप जोशी यांनीच यशस्वीरीत्या सांभाळली आहे. आता महापौरपदाच्या काळात त्यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि कोव्हिड काळात रस्त्यावर उतरून केलेली जनजागृती, दीनदयाल थाळीच्या माध्यमातून केलेले अन्नदान यामुळे जनमानसात त्यांनी विशेष स्थान प्राप्त केले आहे. राजकारण कमी आणि समाजकारण अधिक या ना. नितीन गडकरी यांच्या विचारानुसार संदीप जोशी यांचा भर समाजकारणावर अधिक आहे. दीनदयाल थाळी हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. दोन वेळा भव्य आरोग्य शिबीर आयोजित करून अनेक गरजूना आरोग्य सेवेचा मोफत लाभ दिला. कामाचा वेग आणि कार्यतत्परता या त्यांच्या जमेच्या बाजू असून पक्षश्रेष्ठी या नावाचा विचार सकारात्मकरीत्या करीत असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून अभिजित वंजारी यांचे नाव यापूर्वीच निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अभिजित वंजारी यांनी पूर्वीपासून तयारी सुरू केली असली तरी काँग्रेसमध्ये ज्याचे नाव चालते त्याला ऐनवेळी डावलण्याचा इतिहास आहे. या मतदारसंघात ऐनवेळी कॉंग्रेसकडून गिरीश पांडव अथवा आशीष देशमुख यांचा विचार होऊ शकतो. जर भाजपकडून महापौर संदीप जोशी यांची उमेदवारी निश्चित झाली तर काँग्रेस असो अथवा भाजपा, विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाचा आमदार हा नव्या दमाचा युवा आमदार असेल, एवढे मात्र निश्चित…!