मुख्यमंत्र्यांना दोनदा पाठविले निवेदन
नागपूर: महावितरणमधील पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक आणि 412 शाखा अभियंत्यांता पदाच्या परीक्षा होऊन आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही निवड यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. या सर्व पदांच्या नियुक्तांबद्दल येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत महावितरणने निर्णय घ्यावा अन्यथा येत्या 2 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
महावितरण नागपूरच्या प्रादेशिक संचालक कार्यालयासमोर 15 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता. पण महावितरणने या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे व आंदोलन तूर्तास मागे घेण्याची विनंती केली होती. या कारणास्तव महावितरणला 30 ऑक्टोबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. महावितरणने मागविलेले मार्गदर्शन शासनाने 30 ऑक्टोबरपर्यंत महावितरणला द्यावे. अन्यथा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येईल असेही बावनकुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना बावनकुळे यांनी दोनदा निवेदन दिले आहे.
उपकेंद्र सहायकाची 2000 पदांची निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली पण त्याचा निकाल अजून घोषित करण्यात आला नाही. तसेच पाच हजार विद्युत सहायकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती पण भरती प्रक्रिया अजून घोषित करण्यात आली नाही. पदविकाधारक शिकाऊ अभियंता या 412 पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. पण निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली पण निवड झालेल्या कर्मचार्यांची यादी घोषित करण्यात आली नाही, असेही महावितरणने बावनकुळे यांना कळविले आहे.
या रिक्त पदांसाठी हजारो उमेदवारांनी आपले अर्ज करून आवश्यक त्या प्रक्रिया पार पाडल्या आहेत. आता हे हजारो तरुण नियुक्तीची वाट पाहात आहे. या संदर्भात उमेदवारांना योग्य ती माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे, याकडही बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे.