Published On : Thu, Nov 5th, 2020

बांबू इंधनाचा पर्यायी स्रोत : नितीन गडकरी

Advertisement

अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद या उद्योगात

नागपूर: केवळ सिमेंट फॅक्टरीच नव्हे तर सार्वजनिक वाहतुकीसाठी लागणार्‍या जैविक इंधनासाठ़ीही बांबू हा इंधनाचा पर्यायी स्रोत होऊ शकतो. तसेच बांबू उद्योग हा प्रचंड मोठा उद्योग होऊ शकतो व रोजगार निर्मितीचे मोठे साधन म्हणूनही उदयास येऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘बांबूचे साहित्य आणि बांबू इंधनाचा पर्यायी स्रोत’ या विषयावरील बेविनारमध्ये ना. गडकरी संबोधित करीत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग व बांबू क्षेत्रातील अनेक तज्ञ ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले- बांबूचा इंधन म्हणून वापर करण्याची कल्पना करताना कृषी, ग्रामीण आणि आदिवासी मागास भागाच्या क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. कारण देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आज अत्यंत कठीण मार्गाने जात आहे.

साखर, तांदूळ, गहू मुबलक प्रमाणात देशात उपलब्ध आहेत. देशातील किमान हमी भाव हा आंतरराष्ट्रीय बाजार आणि व्यापारी बाजारापेक्षा अधिक असल्यामुळे देशातील शेतकर्‍यांना यावेळी दिलासा देणे आवश्यक आहे. उत्तर पूर्व भारतात बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असला तरीही रिकाम्या जागांवर बाबूंची लागवड करणे गरजेचे आहे. वनविभागाकडे अशा खूप जागा उपलब्ध आहेत. बाबूंच्या 170 जाती भारतात आहे. पण चीनमध्ये 360 जाती आहेत. एकरी 200 टन उत्पादन देणार्‍या भीमा बांबूची लागवड उपयोगी आहे. 40 टन उत्पादन देणारा बांबू नको, असेही ते म्हणाले.

देशातील सिमेंट फॅक्टरी बॉयलरमध्ये कोळशाचा उपयोग करतात. त्या ठिकाणी बांबूचा उपयोग केला गेला पाहिजे. बांबूची कॅलरिक व्हॅल्यू कोळशापेक्षा कमी असली तरी कोळशाच्या तुलनेत बांबूपासून निघणारा कार्बन हा अत्यंत कमी आहे. कोळसा जाळला असता 48 टक्के कार्बन तर बांबूपासून 5 ते 6 टक्केच कार्बन निर्माण होतो. हे लक्षात घेता सिमेंट फॅक्टरीमध्ये इंधन म्हणून बांबूच्या वापराला प्राधान्य मिळावे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अगरबत्तीसाठी लागणारा बांबू चीनमध्ये आहे. त्या जातीची लागवड आपल्याकडे करणे आवश्यक आहे. उत्तर पूर्व भारतात बांबूचे अधिक प्रमाण आहे. त्यामुळे बांबूची वाहतूक जलमार्गाने केली तर वाहतूक खर्चात कमालीची बचत होईल.

जलमार्ग शक्य नसल्यास रेल्वेने वाहतूक करणे परवडणारे आहे, असेही ते म्हणाले.
बांबूत मॉईश्चर अधिक आहे. त्यामुळे त्याची कटाई केली तर मॉईश्चर कमी होईल आणि कॅलरिक व्हॅल्यू वाढेल. बांबूपासून इथेनॉल, बायो सीएनजी बनविणे शक्य आहे. हा प्रयोग यशस्वीही झाला आहे. विमानासाठी लागणारे इंधनही बांबूपासून बनते. तांदूळ, उसाच्या चिपाडापासून, बांबूपासून इथेनॉल बनवले तर इथेनॉलची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल व सार्वजनिक वाहतुकीसाठी जैविक इंधनाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. बांबूचा उपयोग फर्निचर, कपडे, लोणचे, पेपरमिल, सिमेंट फॅक्टरी अशा अनेक उद्योगांमध्ये होतो. यशस्वी उद्योजकांना बांबू द्या. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला हा उद्योग अर्थव्यवस्था बदलू शकतो, असेही ना. गडकरी याप्रसंगी म्हणाले.

Advertisement