Published On : Fri, Nov 27th, 2020

फडणवीस शासनाने विदर्भाला दिलेले 4 हजार कोटी परत का गेले?

Advertisement

-माजी मंत्री बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला सवाल
-श्रेय घेण्याच्या चढाओढीत विकास कामे ठप्प

नागपूर: राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी दिलेला 4 हजार कोटी रुपयांचा निधी सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे परत गेला, असा आरोप माजी ऊर्जा मंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती हा विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस असून मागील एक वर्षाच्या काळात या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. केवळ श्रेयवादाच्या लढाईमुळे सर्व विकास कामे ठप्प पडली असून या कामांसाठी निधीही उपलब्ध करून दिला नाही, असे सांगत बावनकुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीला निधी मिळालेला नाही. मुख्यमंत्री मुंबईचे, उपमुख्यमंत्री पुण्याचे आणि मंत्री आपापल्या मतदारसंघाचे असा कारभार सध्याच्या सरकारचा सुरु आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या सरकारमध्ये श्रेय घेण्याच्या चढाओढीत विदर्भातील विकास कामे आणि योजना फसल्या आहेत. त्यामुळे विदर्भावर अन्याय केला जात आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारे अधिवेशनही या सरकारने पळविले. यंदा पावसामुळे सोयाबीन, तूर,कापूस, धान आणि फळ भाज्यांचे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.पण सरकारने फक्त शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पूरग्रस्त भागातील नागरिक आजही शाळा आणि अंगणवाड्यांमध्येच राहात आहेत, त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविला गेला नाही. पाच कोटी वीज ग्राहकांच्या वीज बिलाचा प्रश्न या सरकारला सोडविता आलेल नाही. ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि सरकारमधील मंत्री खोडून काढतात, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

गोरगरीब,निराधारांसाठी असलेली संजय गांधी योजना व अन्य योजनांच्या समित्यांचे गठन झालेले नाही. परिणामी लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. रेशन कार्ड आहे पण आरसीआयडी नंबर मिळत नाही. रस्ते, वीज, पाणी यांचा बॅकलॉग वाढत आहे, याकडे लक्ष वेधून बावनकुळे म्हणतात- जलसंधारणाची कामे बंद पडली आहेत. सरकारच्या सापत्न वागणुकीमुळे वर्षभरात विदर्भाच्या आणि जनतेच्या वाट्याला अन्यायाशिवाय काहीच आले नाही. मग वर्षपूर्तीचा आनंद साजरा करून विदर्भातील जनतेच्या दु:खावर मीठ चोळले जात असून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले हे सरकार असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

Advertisement