नागपूर. युवा मोर्चाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते महापौर पद आणि आता पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रत्येकाला सोबत घेउन मनोभावे पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. पुढे पदवीधरांचे प्रतिनिधीत्व करतानाही सर्वसमावेशक विकासालाच प्राधान्य देणार आहे, असा निर्धार नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांनी केला.
भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.२८) उत्तर नागपूरमध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे पदवीधर मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उत्तर नागपुरातील विनोबा भावे नगर येथील फुले सेलिब्रेशनमध्ये आयोजित पदवीधर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव मेंढे होते. प्रमुख अतिथी म्हणून खोरिप चे नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे, आमदार गिरीशजी व्यास, भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, रमेश फुले, नगरसेवक गोपीचंदजी कुमरे, नगरसेविका निरंजनाताई पाटील, दुर्गाताई हत्तीठेले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच विधिमंडळात पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगळ्या प्रतिनिधीची निवड केली जात आहे. समाजातील सुशिक्षित, सामंजस, सुज्ञ लोकांनी तेवढ्याच स्पष्टपणे, पारदर्शी पद्धतीने आपल्या प्रतिनिधीची निवड करावी यासाठी निवडणुकीची पद्धतही वेगळी ठेवण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार म्हणून उभा आहे. पदवीधरांनी साथ दिल्यास बाबासाहेबांच्या विचारांचा ठसा विधिमंडळातही मांडण्यास कटिबद्ध आहे, अशी भावनाही संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
धर्माभिनिवेश बाजूला सारून आंबेडकरी समाज संदीप जोशी यांच्या पाठीशी : ॲड. धर्मपाल मेश्राम
नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी हे सामाजिक कार्यासाठी नेहमी झटून येणारे आहेत. त्यांच्याकडे जाणा-या कोणत्याही नागरिकाची ते मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये कधीही जातीपातीचा वा अन्य कोणताही भेदभाव केला जात नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहरामध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामध्ये संदीप जोशी यांचे योगदान मौलिक आहे. नागपूर शहराचा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक बाबतीत विकास करण्यामध्ये संदीप जोशी यांचे नेतृत्व अधिकच भर घालेल यामध्ये कुठलेही दुमत नाही. त्यामुळे धर्माभिनिवेश बाजूला सारून आंबेडकरी जनता सदैव विकास आणि विकासाचे दृष्टीकोन ठेवणा-या संदीप जोशी यांच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दर्शविला.
पदवीधर मेळाव्याच्या आयोजनासाठी शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, महेश पाटील, विराग राउत आदी पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.