जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनी घेतली लस
जिल्ह्यातील हेल्थ वर्कर्सचे 4613 लाभार्थ्यांचे लसीकरण
भंडारा :- बहूप्रतिक्षीत कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात 16 जानेवारी पासून सुरूवात झाली असून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 4 हजार 613 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणास सुरूवात झाली असून महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी व होमगार्ड आदींना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज आढावा घेतला असून लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सुचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे, डॉ. माधूरी माथूरकर व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लसीकरणाला सुरूवात करण्यात आली यात 8 हजार 144 हेल्थ वर्कर्स लाभार्थी आहेत. त्यापैकी 4 हजार 613 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. उर्वरित लसीरकण तात्काळ करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणास आज पासून सुरूवात झाली आहे. यात पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह अधिकारी-कर्मचारी तसेच कोविड काळात काम करणारे असे एकूण 4 हजार 39 व महसूल विभागातील 825 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरणाचा मॅसेज आल्यावर दिलेल्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले. लसीकरणासाठी उपाशी पोटी जाऊ नये, काहीतरी खाल्याशिवाय लस घेवू नये असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे गरोदर स्त्रीया, स्तनदा माता, सहव्याधी, उच्च रक्तदाब व ताप असलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार नाही. असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कोवीड लसीकरण केल्यानंतर पाच ते दहा टक्के लाभार्थ्यांना ताप, अंगदुखी अशी सौम्य लक्षणे जाणवतात. अशा वेळी घाबरून न जाता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. ज्या लाभार्थ्यांनी 16 जानेवारीला पहिला डोस घेतला त्यांना 15 फेब्रुवारी पासून दुसरा डोस देण्यात येणार असून या बाबतचा मॅसेज नोंदणीकृत मोबाईल प्राप्त होणार आहे. मॅसेज प्राप्त होताच लसीकरणासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
आतापर्यंत जिल्ह्याला 17 हजार डोस प्राप्त झाले असून भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, पवनी, साकोली व लाखांदूर या केंद्रांना 7 हजार 750 डोस वितरीत करण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी पर्यंत सामान्य रुग्णालय, भंडारा-21, उपजिल्हा रुग्णालय तुमसर-13, ग्रामीण रुग्णालय लाखनी-8, ग्रामीण रुग्णालय पवनी-6, ग्रामीण रुग्णालय मोहाडी-3, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर-4 व उपजिल्हा रुग्णालय साकोली- 3 असे लसीकरणाचे एकूण 58 सेशन पार पडले आहेत.
फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणास आज पासून सुरूवात झाली असून जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनी सामान्य रुग्णालय भंडारा येथे कोविड 19 लस घेतली आहे. पोलीस प्रमुख या नात्याने फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाचा शुभारंभ श्री. जाधव यांच्या लसीकरणाने झाला.