भंडारा:- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, पुणेच्या वतीने कोविड 19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जनजागृती अभियान बहु माध्यम प्रदर्शनी व्हॅन च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यात राबविण्यात येत आहे.
क्षेत्रिय लोकसंपर्क ब्यूरो, नागपूरच्या वतीने भंडारा जिल्ह्यात आज अतिरिक्त जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांच्या हस्ते फित कापून आणि हिरवी झेंडी दाखवून या बहु माध्यम प्रदर्शनी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऊईके, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते व क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो नागपूरचे तांत्रीक सहाय्यक संजय तिवारी उपस्थित होते. यावेळी असर फाऊंडेशन, भंडारा यांच्या वतीने गीत नाटक कार्यक्रम सादर करण्यात आला.
सदर प्रदर्शनी व्हॅनव्दारे पुढील दहा दिवस भंडारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या व्हॅनमध्ये एल.ई.डी. डिस्प्ले, दृकश्राव्य माध्यम, पोस्टर प्रदर्शनी, कलापथक इत्यादी बहूमाध्यमांचा समावेश आहे.