नागपूर: शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित झोन सभापतींच्या पदग्रहणाचा कोणताही मोठा कार्यक्रम न घेता झोन सभापती कक्षामध्येच औपचारीक कार्यक्रम पार पाडण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.
महापौरांच्या निर्देशानुसार सर्व झोन कार्यालयामध्ये सभापती कक्षामध्येच मावळत्या सभापतींकडून कार्यभार स्वीकारून पदग्रहण केले जात आहे. शहरात वाढती कोरोना बाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. अशात कुठेही गर्दी होउ नये यासाठी मनपा सर्वतोपरी कार्यवाही करीत आहे.
कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी कुठेही मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मोठे समारंभ व गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे मनपाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोर व्हावी यादृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व नवनिर्वाचित झोन सभापतींना निर्देश दिले आहेत.