Published On : Tue, Feb 23rd, 2021

धंतोली झोन सभापती वंदना भगत यांनी स्वीकारला पदभार

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोन सभापतीपदी अविरोध निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक ३३च्या नगरसेविका वंदना भानुदास भगत यांनी मंगळवारी (ता.२३) सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. धंतोली झोन सभापती कक्षामध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळत्या झोन सभापती लता काडगाये यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला.

याप्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, उपमहापौर मनीधा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अविनाश ठाकरे, नगरसेवक सर्वश्री विजय चुटेले, प्रमोद चिखले, मनोज गावंडे, नगरसेविका भारती बुंडे, विशाखा बांते, माजी स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, भाजपा दक्षिण मंडळ महिला आघाडी अध्यक्षा ज्योती देवघरे, युवा मोर्चा अध्यक्ष अमर धरमारे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष चंद्रशेखर केळझरे आदी उपस्थित होते.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित झोन सभापती वंदना भगत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. झोन सभापती हे ‘मिनी महापौर’ असतात. जनतेच्या प्रश्नांना त्यांच्या स्थानिक स्तरावर त्वरीत न्याय मिळावा यादृष्टीने झोन कार्यालय व त्याचे नेतृत्व म्हणून झोन सभापती पदाची रचना करण्यात आली आहे. शहराचा प्रथम नागरिक म्हणून कार्य करताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे झोन सभापतींनी सहकार्याच्या भावनेतून व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार मोहन मते यांनी वंदना भगत यांच्या नेतृत्वामुळे धंतोली झोन परिसरातील अनेक समस्या आणि प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : वंदना भगत
ज्या जनतेने विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिले त्याच जनतेच्या सेवेकरिता सभापतीपदाचा उपयोग करण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची दिग्गजांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती वंदना भगत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन भिमराव पुसे यांनी केले.

Advertisement