6 ते 14 वर्षा पर्यंतच्या मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात
कामठी :-शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी निर्गमित केलेल्या आदेशांनव्ये शाळाबाह्य ठरलेल्या मुलांची सर्वेक्षण विशेष शोध मोहीम कामठी तालुक्यात 1मार्च पासून सुरुवात करण्यात आली असून ही मोहीम 10 मार्च पर्यंत राहणार आहे.या सर्वेक्षण मोहिमेसाठी तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
या मोहिमे अंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंतची किती मुले शिक्षणापासून वंचित आहेत यांची माहिती घेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. तसेच तीन ते सहा वयोगटातील जी बालके एकात्मिक बाकविकास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत , खासगी, बालवाडी, इंग्रजी माध्यमाची ज्युनियर के जी सिनियर केजीत जाण्यापासून वंचित आहेत त्यांचाही शोध या मोहिमेत घेतला जात आहे. तर तब्बल तीन वर्षांनी ही मोहीम राबविली जात आहे.
गठीत केलेल्या या तालुकास्तरीय समितीत अध्यक्ष तहसीलदार अरविंद हिंगे , सह अध्यक्ष बीडीओ अंशुजा गराटे, सदस्य सचिव गटशिक्षण अधिकारी प्रदीप नागपुरे, तसेच सहा सदस्य आहेत.या सर्वेक्षणातून गजबजलेल्या वस्त्या, वीटभट्टी वरील कामाकरिता आलेले मजूर, स्थलांतरित मजूर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिग्नल जवळ ,भीक मागणारी मुले , आदी ठिकाणी फिरून या शोध मोहीम पथकातील कर्मचारी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्न करीत आहेत .
संदीप कांबळे कामठी