विविध प्रकल्पांची ‘स्फूर्ती’अंतर्गत अमलबजावणी
नागपूर: देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी गावागावात रोजगार निर्मिती झाली पाहिजे. खादी ग्रामोद्योगच्या ‘स्फूर्ती’ योजनेमुळे गावागावात रोजगार निर्मिती होईल. ही योजना देशात सामाजिक-आर्थिक परिवर्तन आणणारी योजना आहे, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
विविध उद्योगांसाठी स्फूर्तीच्या योजनांची अमलबजावणी याविषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ना. गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले- रोजगार वाढविण्यासाठी अधिक सहभाग हे आमचे मिशन आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर आधारित स्फूर्ती योजना आहे. ज्याप्रमाणे आर्थिक अंकेक्षण केले जाते, त्याप्रमाणेच या योजनेत काम करणार्या शासकीय यंत्रणेच्या कामगिरीचेही अंकेक्षण केले गेले पाहिजे. रोजगार निर्मितीसाठी आम्हाला ताकदीने काम करायचे आहे. हे करीत असताना तंत्रज्ञानाचा वापरही करणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
https://www.facebook.com/watch/?v=3727620407316097
‘स्फूर्ती’ अंतर्गत येत असलेल्या सर्व योजना आणि स्फूर्तीची कार्यपध्दती डिजिटल करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकार्यांना यावेळी दिल्या. एमएसएमईच्या प्रत्येक योजनेची कार्यपध्दती ही डिजिटल, पारदर्शक, वेळेत निर्णय देणारी, परिणामकारक आणि भ्रष्टाचार मुक्त असली पाहिजे. काम करणारी संस्था कोणाची आहे, मालक कोण आहे, याकडे लक्ष न देता, संस्थेने किती रोजगार निर्मिती केली, सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीत संस्थेचा किती सहभाग आहे, अशा पध्दतीचे मूल्यांकन करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. स़़्फूर्तीचे विविध उद्योगांचे सध्या 394 क्लस्टर आहेत. यापैकी 94 कार्यरत आहे. हे संपूर्ण क्लस्टर कार्यरत होण्यासाठी लवकर कारवाई करा, असे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले.
रोजगार निर्मिती करणार्या या योजनेचे 5 हजार क्लस्टर आम्हाला निर्माण करायचे आहेत. यामुळे हजारो लोकांच्या हातांना काम मिळून नवीन रोजगार निर्माण होईल. यासाठीच या योजनेची कार्यपध्दती अधिक सोपी आणि डिजिटल करणे आवश्यक आहे. स्फूर्ती योजनेसाठी येणारे उद्योगांचे प्रस्ताव 3 महिन्यात निकाली काढा, यात कोणताही समझोता होणार नाही, असेही ना. गडकरी म्हणाले.