– समिती अंतर्गत येणाऱ्या कामांचा घेतला आढावा
नागपूर : शहरात सुरू असलेल्या रमाई घरकुल योजनेच्या संपूर्ण कामाचा तपशील पुढील सात दिवसात सादर करण्याचे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समितीचे नवनिर्वाचित सभापती हरीष दिकोंडवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सोमवारी (ता. १५) समिती अंतर्गत येणाऱ्या विभागाद्वारे सुरू असलेल्या कामासंदर्भात मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृह येथे बैठक पार पडली.
बैठकीत गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समितीच्या उपसभापती रूतिका मसराम, सदस्या कांता रारोकर, भारती बुंडे, सहायक अभियंता सोनाली चव्हाण, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राजेश भगत, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, गांधिबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, लकडगंज झोनच्या सहायक आयुक्त साधना पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समितीचे सभापती हरीष दिकोंडवार यांनी समिती अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच शहरात सुरू असलेल्या रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनांचा संपूर्ण तपशील पुढील सात दिवसात समितीपुढे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच गलिच्छ वस्ती सुधारणेअंतर्गत मनपा अंदाजपत्रकात काय तरतुद आहे याची माहिती, घरबांधणी प्रकल्पात येणाऱ्या अडचणीसंदर्भात पाठपुराव्याची माहिती, झोन स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमाची संपूर्ण माहिती पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश हरीष दिकोंडवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच घरबांधणी संबंधित ज्या संस्थेला काम दिले आहे त्या संस्थेची पुर्ण माहिती, आतापर्यंत रमाई घरकुल योजनेअंतर्गत किती नागरिकांनी अर्ज केले, किती नागरिकांचे अर्ज मंजूर झाले याचा तपशिल सुध्दा समितीपुढे सादर करण्याच्या सूचना हरीष दिकोंडवार यांनी केल्या.