पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त धोरण राबविण्यावर भर : ४० इलेक्ट्रिक मिडी बसची होणार खरेदी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२०-२१ चा सुधारित व २०२१-२२ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ परिवहन व्यवस्थापक रविंद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्याकडे सोपविला. सन २०२०-२१ च्या सुधारीत वार्षिक अर्थसंल्पीय अंदाजात ७७.०३ कोटी उत्पन्न अपेक्षित असून ७६.८६ कोटी खर्च अपेक्षित आहे. तर सन २०२१-२२ चा वार्षिक अर्थसंकल्प ‘ब’ २४६.०४ कोटींचा अपेक्षित असून २४५.८७ कोटी खर्चाचा राहील.
मंगळवारी (ता. १६) मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात परिवहन समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प समितीला सादर केला.
बैठकीत उपमहापौर तथा परिवहन समितीच्या सदस्या मनिषा धावडे, अर्चना पाठक, वैशाली रोहणकर, रूपा रॉय, विशाखा बांते, रूपाली ठाकूर, सदस्य सर्वश्री राजेश घोडपागे, नागेश मानकर, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम व जनसंपर्क अधिकारी अरूण पिंपरूडे, स्थापत्य उप अभियंता केदार मिश्रा, स्वीय सहायक तथा यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे आदी उपस्थित होते.
परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, सदर अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने परिवहन उपक्रमासाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत जे-जे स्वतंत्र शीर्ष अर्थसंकल्पामध्ये नियोजित करावयाचे होते त्या सर्व बाबींचा प्रामुख्याने या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे. यात परिवहन उपक्रमाच्या परिचालनाकरिता ‘शहर परिवहन निधी’ तसेच महसुलाच्या जादा शिलकीचा विनियेग करण्याकरिता ‘महसुल राखीव निधी’ या नावाने स्वतंत्र शीर्ष उघडण्यात आलेले असून, ‘परिवहन सुधारणा निधी’ सुद्धा स्थापन करण्यात आला आहे.
नागरिकांना कार्यक्षम व सुनियोजित बस सेवा देण्याच्या अनुषंगाने शहर बस सेवेचे पुर्ननियोजन प्रवाशांच्या प्रमाणानुसार करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव अद्यापही कायम असल्यामुळे सद्यस्थितीत शहर बस सेवेचा लाभ घेणाऱ्या दैनिक प्रवाशांची संख्या अंदाजे ५० हजार असून दैनिक बसेसच्या एकूण अंदाजे तीन हजार ५०० फेऱ्या सुरू आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात डिझेल/सी.एन.जी. वर चालणाऱ्या १५३ स्टँडर्ड बसेस, ७३ मिडी बसेस, २१ मिनी बसेस आणि इलेक्ट्रिक चार्जिंगवर महिलांसाठी चालणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस अशा एकूण २५२ बसेस सुरू असल्याची माहिती श्री. भेलावे यांनी दिली.
चालू अर्थसंकल्पीय वर्षात परिवहन विभागाच्या विकासात व प्रशासकीय कामात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने काही योजना पूर्णत्वास नेण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. प्रदुषणमुक्त व पर्यावरणपूरक धोरण रबविण्याच्या अनुषंगाने मनपाच्या २३७ स्टँडर्ड डिझेल इंधन बसचे रूपांतरण सीएनजी इंधन बसमध्ये करण्यात येत आहे. यापैकी ५५ बसेसचे रूपांतरण सीएनजी इंधन बस मध्ये करण्यात आले आहे.
कोव्हिड काळातील सेवेचा उल्लेख
कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० ते २७ ऑक्टोबर २०२० पर्यंत शहर बस सेवा पूर्णत: बंद होती. मात्र या काळात शहर बसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा विशेष उल्लेख अर्थसंकल्पीय निवेदनात करण्यात आला. कोरोना महामारीदरम्यान रुग्णांना विलगीकरण केंद्रांवर नेणे, झोननिहाय देण्यात आलेल्या बसेसमधून डॉक्टर्स, परिचारिकांची ने-आण करणे, कोरोना मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे शव नेण्याकरिता मिनी बसचे शववाहिकेत करण्यात आलेले रुपांतर, कोरोना चाचणीसाठी बसेसच्या मागील भागात करण्यात आलेली विशिष्ट प्रकारची सुरक्षित व्यवस्था आदींचा उल्लेख यात करण्यात आला आहे. प्रति ऑपरेटर २० बस याप्रमाणे तीन ऑपरेटर मिळून ६० चबसेस कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र सेवेत होत्या, असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबी :
– रु. ४५ लाख प्रमाणे ४० इलेक्ट्रिक मिडी बसेस करिता १८ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार.
– ४० मिडी बसेसकरिता खापरी डेपो येथील ८.७५ एकर पैकी ३.७० एकर जागा मे. इवे ट्रांस प्रा.लि. ला देण्याचे निश्चित.
– बस आगारांतर्गत रस्ते व परिसरातील विकासात्मक कामे या लेखाशीर्षांतर्गत ३ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद.
– वाठोडा बस डेपो निर्मितीकरिता प्रारंभी १० कोटींची तरतूद
– बस थांबा फलक उभारणी करिता सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु. ७५.०० लाखांची तरतूद.
– ‘प्रकीर्ण लोकसुधार कार्य भूअर्जन’ तथा सर्व बस डेपोसंबंधी विकासात्मक कामे या लेखाशीर्षांतर्गत रु. पाच कोटींची तरतूद. यात खापरी डेपो येथील वर्कशॉप व इमारत दुरुस्ती, पारडी नाका येथील इमारत दुरुस्तीचे काम, लकडगंज डेपा येथील रस्ता दुरुस्ती व टॉयलेट निर्मितीचे काम आणि मोरभवन येथील डी.पी. रोडच्या कामाचा समावेश.