कोरोनाबाधितांच्या घराची पाहणी
नागपूर: महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी मंगळवारी (१६ मार्च) रोजी मंगळवारी झोनच्या आर.आर.टी. टीम सोबत काँटेक्ट ट्रेसिंगच्या कार्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ.टिकेश बिसेन व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.अतीक खान उपस्थित होते.
आयुक्तांनी गोरेवाडा भागात आर.आर.टी.सोबत कोरोनाबाधितांच्या घरांची पाहणी केली. त्यांनी मंगळवारी झोनच्या आरोग्य कर्मचा-यांना निर्देश दिले की नियंत्रण कक्षावरुन गृह विलगीकरणमध्ये असलेले कोरोना बाधितांना पहिल्या, चौथ्या, सातव्या व दहाव्या दिवशी फोन करुन त्यांची प्रकृतिबददल माहिती घेण्यात यावी. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले २०-३० नागरिकांची चाचणी करण्यात यावी. आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जास्तीत-जास्त नोंदणी करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी टीम सोबत गृह विलगीकरण मध्ये कोरोना बाधित नियमांचे पालन करतात की नाही याचीपण तपासणी केली.
यावेळी आयुक्तांनी मास्क चा उपयोग न करणारे दुचाकी वाहन चालकांना दंड करण्याचे निर्देश ही दिले. मनपातर्फे १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंधने कडक करतानाच नागरिकांनी कामाशिवाय रस्त्यावर फिरु नये, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले असूनही मोठया प्रमाणात नागरिक विनाकारण घराबाहेर फिरतांना दिसत आहेत. मनपा आयुक्तांनी अश्या नागरिकांची विचारपूस करणे आणि ज्या नागरिकांचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांना दंड लावण्याचे निर्देश दिले आहे.