व्यवस्था उत्तम ठेवण्याचे निर्देश
नागपूर : आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणासोबतच केन्द्र व राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी व ४५ ते ५९ वर्षापर्यंतचे विविध आजारांने ग्रस्त नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेच्या नवीन ११ केन्द्रांवर सुरु करण्यात आले. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी या नवीन केन्द्रांची पाहणी करुन व्यवस्थेचा आढावा घेतला.
महापौरांनी लसीकरण केन्द्रातील प्रतीक्षागृह, लसीकरण गृह, निरीक्षण गृहाची पाहणी करुन लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्री. संजय महाजन, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समितीचे सभापती हरीष दिकोंडवार, नेहरुनगर झोन सभापती श्रीमती स्नेहल बिहारे, लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती पल्लवी श्यामकुळे, नगरसेविका श्रीमती सोनाली कडु, नगरसेविका श्रीमती जयश्री रारोकर व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.
महापौरांनी पिण्याच्या पाण्याची, डिस्पोजल ग्लासची, सॅनीटाइजेशन, पंडाल व शौचालयाची उत्तम व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. त्यांनी कोरोना चाचणी केन्द्रांमध्ये आर.टी.पी.सी.आर चाचणीची संख्या वाढविण्याची ही सूचना केली.
नागपूर महानगरपालिकातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नवीन ११ केन्द्र उघडण्यात आले आहे. या केन्द्रांमध्ये सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत येथे ६० वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना व ४५ ते ५९ वर्षापर्यंतचे विविध आजाराने ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केल्या जात आहे. कोम-आर्विड नागरिकांना डॉक्टर कडून विहीत नमून्यात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण नि:शुल्क आहे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे रु. २५० दर आकारले जात आहे.
बुधवारी उघडण्यात आलेल्या या नवीन केन्द्रांमध्ये इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, कपिल नगर नागरी आरोग्य केन्द्र, पारडी प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, शांतिनगर प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, नंदनवन प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, बाबुलखेडा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, मानेवाडा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, खामला आयुर्वेदिक दवाखाना, स्व.प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केन्द्र आणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे.
पॉजीटिव्ह रुग्ण लसीकरणासाठी येऊ नये : महापौरांचे आवाहन
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी सध्या कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना व त्यांच्या निकटवर्तीयांना लसीकरणासाठी केन्द्रामध्ये न येण्याचे आवाहन केले आहे. महापौरांना सूचना मिळाली की काही लसीकरण केन्द्रामध्ये सध्या कोरोनाबाधित असलेले रुग्ण व त्यांचे परिवाराचे सदस्य लस घेण्यासाठी येत आहे. नियमाप्रमाणे त्यांना लस घेता येत नाही. त्यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांमुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना समस्या निर्माण होऊ शकते. तरी कोरोना रुग्णांनी यासंबंधी काळजी घ्यावी आणि डॉक्टरांचे सल्ल्यानुसार प्रकृती बरी झाल्यानंतर लस घ्यावी.