Published On : Sat, Apr 24th, 2021

वाढीव बेड व लसीकरणाच्या मोहिमेला गती द्या – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Advertisement

प्रत्येक रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट करा

नागपूर– कोरोना रुग्णांसाठी नागपूर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वाढीव बेडची व्यवस्था तसेच कोरोना लसीकरणाची मोहिम प्राधान्याने राबवा, असे निर्देश पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व उपचाराच्या उपाययोजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, ग्रामीण पोलीस आयुक्त राकेश ओला व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यावेळी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात दररोज 7 हजार रुग्णांची भर पडत असल्याने रुग्णालयात वाढीव बेडची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मानकापूर येथील क्रीडा संकुलात तसेच महापालिकेच्या रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. यासाठी ऑक्सीजनचा पुरवठा करण्याच्या संदर्भात उपाययोजना झाली असून भिलाई स्टिल प्लांट, राऊरकेला येथून तसेच नागपुरातील 11 प्लांटमधून शहरात ऑक्सीजनचा पुरवठा सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रूग्णालयांचे फायर ऑडीट करा
राज्यातील काही रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या तसेच ऑक्सीजन गळती होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे काहीजणांचे प्राण गेले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी हे काम प्राधान्याने करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

लसीकरणाला प्राधान्य द्या
येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करावयाचे असल्याने या मोहिमेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शहरात 187 व ग्रामीण भागात 177 लसीकरण केंद्र असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण आवश्यक असून जिल्ह्यातील दररोज 1 लाख जणांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यानुसार केंद्र सरकारकडे लसीची मागणी करावी, असे निर्देश डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.

आवश्यक असेल तरच रेमडीसीवीर द्या
नागपूर जिल्ह्यात 12 हजार रेमडीसीवीर इंजेक्शनची मागणी आहे. परंतु तेवढा पुरवठा होत नसल्याने ज्या रुग्णांना रेमडीसीवीरची आवश्यकता आहे. त्याच रुग्णांना रेमडीसीवीर देण्याचे प्रिस्क्रिप्शन द्यावे. यामुळे खऱ्या गरजूंना हे इंजेक्शन उपलब्ध होईल, असे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी केले.

ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेऊन 1 हजार ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे एअर सेपरेशन मशीन घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनचा वापर योग्यरितीने होत आहे काय ? याचीही पाहणी करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement