नागपूर : नागपूर महानगरपालिकेने सर्व खाजगी रुग्णालयांना मार्च आणि एप्रिल, २०२१ मध्ये ८० टक्के खाटांमध्ये आणि २० टक्के खाटांमध्ये किती कोव्हिड रुग्णांना दाखल केले आणि त्यांच्याकडून कोणत्या दराने शुल्क घेतले याची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
कोव्हिड बाधित रुग्णांची सतत तक्रार येत आहे की खाजगी रुग्णालयांकडून जास्त बिल घेतले जात आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या सतत प्राप्त होणा-या तक्रारीची तपासणी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांना दिले. श्री. शर्मा यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन सर्व खाजगी रुग्णालयांना नोटीस देऊन माहिती तात्काळ देण्याचे निर्देश दिले आहे.
श्री. शर्मा यांनी सांगितले सर्वाधिक तक्रार २० टक्के खाटांबददल प्राप्त होत आहे. नागरिकांची तक्रार आहे की त्यांच्याकडून जास्त दर आकारले जात आहे. महाराष्ट्र शासनाने ८० टक्के खाटांवर दर निर्धारित केले आहे. या दरांबददल नागरिकांची तक्रार कमी आहे. मनपाकडून मेडिकल बिलाची पूर्व तपासणी करण्यासाठी अंकेक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक १५ दिवसांनी या अंकेक्षकांची बदली दूस-या रुग्णालयात केली जाते.
श्री. शर्मा यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी ८० टक्के खाटांवर आणि २० टक्के खाटांवर किती कोव्हिड रुग्णांना दाखल केले आणि त्यांच्याकडून आकारलेल्या दरांची माहिती मागितली आहे.
त्यांनी सांगितले सर्व खाजगी रुग्णालयांना ८० टक्के आणि २० टक्के खाटांची माहिती देण्यासाठी सूचना फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये शासनाव्दारे निर्धारित दरांची सुध्दा माहिती असेल. ऑडिटरचे नांव व मोबाईल क्रमांक तसेच तक्रार नोंदविण्याकरीता कंट्रोल रुमचा नंबर सुध्दा सूचना फलकावर लिहण्याचे निर्देश दिले आहे. हया अगोदर ही त्यांना निर्देश दिले होते. जर रुग्णालयांनी निर्देशांचे पालन केले नाही तर त्यांना दंड करण्यात येईल, असा इशारा ही अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी दिला आहे.
रुग्णालयाबाबत तक्रारीचे निराकरणासाठी समिती नियुक्त करण्याचे महापौरांचे आदेश
नागपूर शहरात खाजगी दवाखान्यामार्फत सामान्य रुग्णांचे आर्थिक शोषणासंदर्भात नागरिकांची तक्रार आहे. यावर आळा घालण्यासाठी व नागरिकांमध्ये विश्वास संपादित करण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी समिती गठित करण्याची सूचना मनपा आयुक्तांना केली आहे.
त्यांच्या सूचनेनुसार अति.आयुक्त श्री. जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पांच लोकांची समिती गठित करण्यात येईल. यामध्ये एक उपायुक्त, एक शासकिय विभागातील लेखा वित्त अधिकारी, २ डॉक्टर यांचा समावेश राहील. महापौरांनी आदेशित केले आहे की ५ सदस्यीय समितीने कोणत्याही सामान्य नागरिकांची तक्रार आल्यानंतर ४८ तासाचे आंत त्यांची सुनावणी घेवून तक्रारीचे निराकरण करावे. तक्रारीचे निवारण करीत असतांना दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण निर्णय घ्यावे व आपण समितीतील सदस्यांची नांवे घोषीत करुन येणा-या तिन दिवसात याबाबत कार्यवाही करावी असेही महापौरांनी निर्देश दिले आहे.