पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त धोरण राबविण्यावर भर : आता डिजीटल पेमेंटची सोय होणार
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२१-२२ चा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रविंद्र भेलावे यांनी स्थायी समितीचे सभापती श्री.प्रकाश भोयर यांच्याकडे सोपविला. सन २०२१-२२ चा वार्षिक अर्थसंकल्प २४६.१८ कोटींचा अपेक्षित असून २४६.१५ कोटी खर्चाचा राहील.
शुक्रवारी (ता. २१) मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थायी समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी परिवहन समिती सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यावेळी बैठकीत समिती सदस्य संजय बालपांडे, आयशा उईके, अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे आदी उपस्थित होते.
श्री. भेलावे यांनी सांगितले की परिवहन विभागातर्फे शहर बस प्रवाशांना आदर्श व कार्यक्षम बस सेवा उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने नियोजित धोरणानुसार सन 2021-2022 या वर्षात 67 स्टॅन्डर्ड बस, 170 डिझेल इंधन बसचे सी.एन.जी. बसमध्ये रुपांतरीत होणा-या स्टॅन्डर्ड बसेस, 150 मिडी बस, 45 मिनी बस व 06 इलेट्रीक चार्जिंगवर चालणा-या मिडी बस तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या (सबसिडी अनुदानासह) 40 इलेट्रीक चार्जिंगवर चालणा-या बसेस अशा एकंदरीत 478 बसेस कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
मोरभवन एक्सटेंशन येथील जागेवर म.न.पा.चे शहर बस सेवा संचालन व व्यवस्थापना करीता ‘परिवहन भवनची’ निर्मीती करीता रु. 1 कोटी 50 लाखाचे प्राकलन तयार करण्यात येणार असुन आगामी वर्षात शहराचे मध्यवर्ती जागेत बसेस च्या नियंत्रण व्यवस्थापन व विद्यार्थी आणि नागपुर लगतच्या गावावरून प्रवास करण्या-या प्रवाश्यांच्या सोयी करीता पाससेंटर, चौकशी कक्ष व सुलभ शौचालय युक्त म.न.पा. परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवनची’ निर्मीती करण्यात येईल.
यासोबतच सन 2021-2022 या आर्थिक वर्षात पर्यावरण पूरक व प्रदुषण मुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला जलद गतीने चालना मिळण्या करीता नागपुर महानगर पालिका, परिवहन विभाग तर्फे, ‘शहर परिवहन सुधारणा व्यय’ अंतर्गत म.न.पा.च्या 115 डिझेल बसेसला सी.एन.जी. किट लावण्या करीता स्थायी समिती कडुन म.न.पा. निधीत 6 कोटी रूपयाची तरतुद मंजुर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शहराच्या सिव्हील लाईन्स व बर्डी भागात सी.एन.जी. पंप व इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परिवहन सेवा बळकटीकरणासाठी म.न.पा.च्या स्मार्ट सिटी प्रकल्पा कडुन त्यांचे निधी अंतर्गत 15 इलेक्ट्रिक बसेस शहर परिवहन सेवेकरीता परिवहन विभागाला चालविण्याकरीता मिळणार आहे. आगामी वर्षात डिजीटल पेमेंट सिस्टीम “Phone Pe” किंवा “Paytm” व्दारे प्रवाश्यांना तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्येशाने व तिकीट विक्रीतील चोरीला आळा घालण्याच्या उद्येशाने डिजीटल पेमेंट सिस्टीम प्रवाश्यांकरीता उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
”स्वच्छ भारत योजने“ अंतर्गत प्रायोगिक तत्वावर नागपूर शहरातील प्रमुख बस थांब्यांलगत ज्या भंगार बसेस वापरात नाही अश्या जुन्या बसेसच्या माध्यमातुन ई-टॉयलेट ची निर्मीती हा प्रकल्प कोरोना महामारी प्रादुर्भावामुळे प्रलंबित हेाता हा प्रकल्प पुन्हा सुरू करून महिलांसाठी ‘ती-बस’ “Bio Bus Toilet” तयार करण्यात येईल. या बस करीता शहर परिवहन सुधारणा व्यय या अंतर्गत रु ३० लक्षची तरतुद करण्यात आलेली आहे.
कोव्हिड काळातील सेवेचा उल्लेख
कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० ते २७ ऑक्टोबर २०२० पर्यंत शहर बस सेवा पूर्णत: बंद होती. मात्र या काळात शहर बसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा विशेष उल्लेख अर्थसंकल्पीय निवेदनात करण्यात आला. कोरोना महामारीदरम्यान रुग्णांना विलगीकरण केंद्रांवर नेणे, झोननिहाय देण्यात आलेल्या बसेसमधून डॉक्टर्स, परिचारिकांची ने-आण करणे, कोरोना मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे शव नेण्याकरिता मिनी बसचे शववाहिकेत करण्यात आलेले रुपांतर, कोरोना चाचणीसाठी बसेसच्या मागील भागात करण्यात आलेली विशिष्ट प्रकारची सुरक्षित व्यवस्था आदींचा उल्लेख यात करण्यात आला आहे. प्रति बस ऑपरेटर 20 बस प्रमाणे तिन ऑपरेटर मिळून 60 बसेस या कोव्हिड 19 या महामारीत अहोरात्र म.न.पा.च्या सेवेत कार्यरत होत्या या 60 बसेस आजही कोव्हिड 19 च्या रूग्ण सेवेकरीता कार्यरत असुन सर्वसामान्य नागरिकांना लाभ झालेला आहे.