– सरपंच परमानंद शेंडे यांच्या पत्र व्यवहार, पाठपुराव्यास यश
रामटेक -गट ग्रामपंचायत कांद्री खदान अंतर्गत येणाऱ्या मौजा कांद्री माईन येथे रेल्वे क्रॉसिंग जवळील पहाडी कटिंग करण्याचे काम सुरू असून लवकरच सर्विस रोड व फेन्सिग चे काम सुरू केले जाईल.
नागपूर जबलपूर महामार्ग तयार करतेवेळी पहाडी कटिंग करून सर्विस रोड बनवायला पाहिजे होता परंतु त्यांनी हे काम त्यावेळी केले नसल्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी अपघात झाले. ते ठिकाण म्हणजे अपघात स्थळ म्हणून ओळखले जावू लागले. कारण त्या टेकडी मुळे एका बाजूने पाहिल्यास दुसऱ्या बाजूकडील रोड दिसत नव्हता.म्हणून मागील दिड वर्षापासून ग्रा. पं. च्या माध्यमातून सरपंच परमानंद शेंडे यांनी अनेक वेळा पत्र व्यवहार, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा व संबंधित अधिकारी वर्गाशी संपर्क साधल्यानंतर आत्ता कामाला सुरुवात झालेली आहे. या अगोदर कांद्री वस्ती येथील अंडरपास व सर्विस रोड साठी चक्काजाम आंदोलन करावे लागले. त्याचं फलीत म्हणून अंडरपास व सर्विस रोड बनविला गेला. रेल्वे क्रॉसिंग जवळ सुध्दा अपघाताचे वाढलेले प्रमाण पाहून पुन्हा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्राच्या माध्यमातून देण्यात आला होता परंतु महामार्ग अधिकाऱ्यांनी कसलाही विलंब न करता नागरिकांच्या जीवाचा विचार करीत कामाला सुरुवात केली आहे. सर्विस रोडमुळे भविष्यातील अपघात थांबण्यास मदत होईल व नागरिकांचे जीवन सुध्दा सुरक्षित होईल म्हणून ग्रा. पं. मार्फत अधिकारी वर्गाचे अभिनंदन सुध्दा केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला इलेक्ट्रिक पोल ची व्यवस्था नसल्याने प्रकाश हायस्कूल समोरील महामार्गावर तसेच कांद्री बोंदरी चौरस्त्यावर हायमास्ट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर करण्यासंबंधी पत्र सुध्दा देण्यात आले आहे. याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.