पोलिसांच्या सहकार्याने मनपा एनडीएसची कारवाई : मोठ्या प्रमाणात युवावर्गाची गर्दी
नागपूर : उंटखाना मेडिकलचौकातील ट्रिलियम मॉलमध्ये असलेल्या एजंट जॅक बार येथे कोव्हिड नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिका धंतोली झोनचे उपद्रव शोध पथक आणि इमामवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बारमालकावर कारवाई करीत ३० हजारांचा दंड ठोठावला.
शनिवारी (ता. २६) रात्री ९.२० वाजता ही कारवाई करण्यात आली. बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे माहिती होताच इमामवाडा पोलिसांच्या सहकार्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाने एज़ंट जॅक बारमध्ये धडक दिली. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आढळून आला. तेथे क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती आढळून आले. १०० च्या वर व्यक्तींची संख्या होती. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे तेथे बघायला मिळाले.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बार मालकाने स्वतंत्र कुठलीही व्यवस्था केलेली नव्हती. धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाचे धंतोली झोन प्रमुख नरहरी बिरकड, दिनेश सहारे, हिरानाथ मालवे, सुशील लांडगे, चालक रजत तसेच इमामवाडा ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत बारमालकावर ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तर धोका अजून टळलेला नाही. म्हणूनच मनपा प्रशासनाने भविष्यात कोरोनाची लाट येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे वेळोवळी आवाहन केले आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. असे करणे टाळा. नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी म्हटले आहे. अन्यथा यापेक्षाही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.