बोले पेट्रोल पम्प चौक ते जीपीओ चौक मार्गावर सामाजिक, राजकीय, साहित्य, वैद्यकीय क्षेत्रातील आठ व्यक्तींचे म्यूरल स्थापित
नागपूर : नागपूर शहरातील सामाजिक, राजकीय, साहित्य, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रामध्ये योगदान देणा-या व्यक्तींच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या आठ म्यूरलचे रविवारी (ता.११) राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण झाले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, खासदार विकास महात्मे, आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संयोजक नगरसेवक ॲड.निशांत गांधी, वर्धमान को.ऑपरेटिव्ह बँक लि.चे अध्यक्ष अनिल पारख, उपाध्यक्ष नरेश पाटनी, संदीप डेव्हलपर्स प्रा.लि.चे संचालक अनिल अग्रवाल, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा, युगल रायलू, प्रेमलता तिवारी, दिनेश पारेख, बच्चु पांडे, सय्यद मुमताज आदी उपस्थित होते.
नागपूर महनगरपालिकेच्या वतीने व वर्धमान को.ऑपरेटिव्ह बँक लि. आणि संदीप डेव्हलपर्स प्रा.लि.चेच्या सहकार्याने सिव्हिल लाईन्स परिसरात बोले पेट्रोल पम्प चौक ते जीपीओ चौक दरम्यानच्या मार्गालगत नागपुरचे ख्यातनाम ए.बी.बर्धन, कवी ग्रेस, मा.गो.वैद्य, सुमतीताई सुकळीकर, लोकनायक बापूजी अणे, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, पद्मश्री डॉ.बी.एस.चौबे आणि पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे म्यूरल उभारण्यात आले आहेत. दीपक भगत यांनी या मयूरलची निर्मिती केली तर ‘हिरोज ऑफ नागपूर’ची संकल्पना नगरसेवक निशांत गांधी यांची आहे. या कार्यात गजानन निमदेव, श्रीपाद अपराजित आणि गजानन जानभोर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
नागपूर शहरातील नव्या पिढीला आपल्या शहरातून फेरफटका मारताना अगदी नाविन्यपूर्णरितीने शहराच्या इतिहासात महत्वाचे योगदान देणा-या व्यक्तींचे चरीत्र ओळखता यावे, समजून घेता यावे, यासाठी हा हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यातून आपल्या नव्या पिढीला आपल्या शहरातील इतिहासाची जाण होईलच शिवाय त्यांना यातून प्रेरणाही मिळेल, असे मत यावेळी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विविध क्षेत्रामध्ये योगदान देणारे अनेक दिग्गज नागपूर शहराला लाभले. या दिग्गजांच्या स्मृती जपल्या जाव्यात व त्याची आपल्या येणा-या पिढीला माहिती व्हावी याउद्देशाने शहरातील मार्गालगत असे म्यूरल उभारण्याची संकल्पना नगरसेवक निशांत गांधी द्वारे मांडण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी आवश्यक पाठपुरावा करून घेत या म्यूरलच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला. परिणामी आज शहरातील सिव्हिल लाईन्सच्या हिरव्यागार मार्गालगत सुंदररित्या शहरातील दिग्गजांच्या स्मृतीसह त्यांच्या कार्याचा वारसा जपला जात आहे, याचा आनंद असल्याचे मत महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले.
बोले पेट्रोल पम्प चौकातून जीपीओ चौकाकडे जाताना प्रारंभी स्वातंत्र्य चळवळीसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणा-या भारतीय कम्यूनिस्ट पार्टीचे नेते अर्धेंदू भूषण बर्धन उपाख्य ए.बी.बर्धन यांचे म्यूरल आहे. पुढे मराठी काव्यप्रांतात आपल्या विलक्षण लेखणीची छाप सोडणारे व मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील प्रमुख कवी म्हणून ख्याती असलेले माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचे म्यूरल उभारण्यात आले आहे. याच मार्गावरून पुढे जाताना संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी वाहुन कार्य करीत राजकारणासह सक्रिय सामाजकारणातून वंचितांसाठी झटणा-या सुमतीताई सुकळीकर यांचे म्यूरल तयार करण्यात आले आहे. जनसंघाचा सामान्य कार्यकर्ता ते पुढे पत्रकार, आमदार, शिक्षक, शेतकरी अशा नानाविध भूमिका सांभाळून सामाजिक कार्यात आपली छाप सोडणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालते बोलते विद्यापीठ माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य अर्थात मा.गो. वैद्य यांचे म्यूरल साकारण्यात आले आहे.
जीपीओ चौकातून परत बोले पेट्रोल पम्प चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला ‘विदर्भाचा शेर’ म्हणून सर्वपरिचित असलेले व शेवटपर्यंत स्वतंत्र विदर्भाचा नारा बुलंद करणारे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे म्यूरल उभारण्यात आले आहे. पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे विदर्भातील महत्वाचे नेते, विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते लोकनाय बापूजी अणे यांचे म्यूरल उभारण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असताना खासगी सेवा न देता निवृत्तीनंतर गरीब, गरजूंचे माफक दरात उपचार करणारे ‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून ख्यातीप्राप्त पद्मश्री डॉ.बी.एस.चौबे यांचे या मार्गावर म्यूरल उभारण्यात आले आहे. कुराणचे गाढे अभ्यासक सर्वांना कुराणची महती कळावी यासाठी सोप्या भाषेत ते जनतेपुढे आणणरे ‘मानवता हाच खरा धर्म’ असा संदेश देणारे सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे म्यूरल साकारण्यात आले आहे. शहराच्या इतिहासात महत्वाच्या कार्याद्वारे आपले योगदान देणा-या व्यक्तींचे चरीत्र त्यांची माहिती देणारे हे म्यूरल नागपूरकरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
या आठही म्यूरलच्या लोकार्पण प्रसंगी आठही गणमान्य व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. ‘हिरोज ऑफ नागपूर’ अंतर्गत या आठही म्यूरल ची देखरेख आणि व्यवस्थापन वर्धमान बँक तर्फे करण्यात येणार आहे.