नागपूर -नागपुर तालुक्यातील बेसा बेलतरोडी या ग्रामीण भागातील 6 महिला व 5 पुरुषांनी एकत्र येऊन “दि नागपुर क्रेडीट कोऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादित, ता. नागपूर” ही पतसंस्था स्थापनेचे धाडस केले आहे. विशेष बाब म्हणजे या पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव पदावर महिलांची एकमताने निवड केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील 1961 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 24 कलम (9 एक) अन्वये नोंदणीकृत असलेल्या या सहकारी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. किशोर मानकर (भावसे) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी सहायक पोलिस आयुक्त श्रीमती रेखा भवरे, सेवानिवृत्त बँक अधिकारी दिगंबर चव्हाण, अभियंता श्री प्रशांत ठमके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ. मानकर यांनी या पतसंस्थेच्या संचालक मंडळास शुभेछा देत त्यांनी इमानदारिने कार्य केले तर लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही असे मत व्यक्त केले. पतसंस्थेशी संलग्न लोकांनी आपल्या मिळकतीतुन पाच टक्के निधी संस्थेमध्ये गुंतवला तर समाजातील गरजू लोकांसाठी काही चांगली कामे होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दिगंबर चव्हाण यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशांत ठमके यांनी संस्था चालवताना भाई-भतीजा वाद टाळून लोककल्याणासाठी काम केल्यास पतसंस्थेचे उद्देश निश्चितपणे यशस्वी होतील असे मत व्यक्त केले. अध्यक्ष सौ. संगीता चव्हाण यांनी गरीब महिलांची आर्थिक गरज फार लहान असते. पण अशा वेळेस सुद्धा त्यांना मोठे व्याजदर भरून कर्ज काढावे लागते आणि घरची गरज भागवावी लागते. अशा गरजु महिलांसाठी आमची पतसंस्था निश्चितपणे काम करेल आणि महिलांमध्ये व्यावसायिकता निर्माण करुन पतसंस्थेचे कामकाज भरभराटीस नेण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील असे आश्वासन दिले .
संस्थेच्या सचिव सौ. माया लोखंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष विजय थुल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नितू गोंडाणे यांनी केले. कोविड-19 चे नियम पाळून बेसा परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.