पुणे: राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 6 लाख 28 हजार 630 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यामध्ये इयत्ता पाचवीच्या 3 लाख 86 हजार 328 तर इयत्ता आठवीच्या 2 लाख 42 हजार 302 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
अकरावीच्या सीईटीसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने पहिल्यांदाचा अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.सीईटी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास प्रिया शिंदे यांच्याशी 9689192899 तर संगीता शिंदे यांच्याशी 8888339530 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.