Published On : Fri, Jul 30th, 2021
By Nagpur Today Nagpur News

बांधकाम सुरु असलेल्या भूखंडांवर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवा – प्राजक्ता लवंगारे -वर्मा

Advertisement

क्रेडाई, बांधकाम संघटना, नासुप्र यांची संयुक्त बैठक
·शहरात सहाशे भूखंडांवर बांधकाम सुरु
·बांधकाम मजुरांची तपासणी करा
·सर्व मोकळ्या भूखंडांवर फवारणी

नागपूर: शहर तसेच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या व मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेतानाच डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व बांधकाम संघटना यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरात सुमारे सहाशे भूखंडांवर बांधकाम सुरु आहे. तसेच विविध रस्त्यांचे बांधकाम व सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरु असून या ठिकाणी पावसाचे पाणी साठत असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवरसुद्धा डासांची प्रजननक्षमता वाढत असल्यामुळे अशा सर्व ठिकाणी तत्काळ फवारणीसह स्वच्छता करण्याचे काम महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांनी सुरु करावे, असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व विविध बांधकाम संघटनांच्या प्रतिनिधी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. दीपाली नासरे यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

क्रेडाईचे अध्यक्ष संतदास चावला, माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव गौरव अग्रवाल, कोषाध्यक्ष राजमोहन साहू इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नगरारे आणि कोषाध्यक्ष पुरुषोत्तम हरडे उपस्थित होते.

महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या मदतीने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी डेंग्यू डास उत्पत्तीस्‍थळे नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना करताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक सुरु असलेल्या बांधकामाची तसेच मोकळ्या भूखंडांची तपासणी करावी. या ठिकाणी डास प्रतिबंधक औषध तसेच अबेट या द्रावणाची फवारणी करावी. कायमस्वरुपी पाणी साचत असल्यास तिथे गप्पी मासे सोडून डासाची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

डेंग्यू तसेच मलेरियाच्या आजारासंदर्भात प्रत्येक घराची तपासणी करुन ज्या ठिकाणी तापाने आजारी असलेले रुग्ण आढळतील त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रतिबंधात्मक उपचार तत्काळ सुरु करावेत. शहरात मागील 15 दिवसात 177 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण धरमपेठ व सतरंजीपुरा झोनमध्ये आहेत. डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये आऊटब्रेक कंट्रोल तसेच बायोलॉजिकल कंट्रोल महत्त्वाचा आहे. यामध्ये डास व अंडी नष्ट करण्याला प्राधान्य देण्यात आले असून घरातील साचलेले पाणी नष्ट करण्यासाठी एक कोरडा दिवस पाळण्यात यावा व यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नागपूर सुधार प्रन्यास सभापती मनोज सूर्यवंशी यांनी नागपूर शहर व परिसरात 600 ठिकाणी बांधकाम सुरु असून क्रेडाईच्या माध्यमातून या सर्व जागांवर डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम कामगारांचीही तपासणी करण्यात येत आहे. महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास हद्दीत असलेल्या मोकळ्या भूखंडांचीसुद्धा तपासणी करुन आवश्यक फवारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. क्रेडाई व बांधकाम असोसिएशनच्या प्रतिनिधींनी डेंग्यू निर्मूलन उपक्रमात संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

Advertisement
Advertisement