नागपूर : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, या अनुंषगाने जलसंपदा, कृषी, महावितरण, सर्व उपविभागीय अधिकारी, यांनी सतर्क राहण्यासोबतच समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला. आर यांनी आज दिले.
छत्रपती सभागृहात मान्सुनपूर्व तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकुंश गावंडे, पेंच पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रविण झोड, दक्षिण नागपूर पाटबंधारेचे अभियंता राजेश दमणे, गोसीखुर्द धरण वाही (पवनी) चे अभियंता राजेश शर्मा उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे गरजेचे आहे. तालुका किंवा गावपातळीवर कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास सर्वात आधी ती जिल्हा प्रशासनाला कळवावी. जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनीची खात्री सर्व अधिकाऱ्यांनी करावी, स्वत: दूरध्वनी करावेत. जबाबदारी निश्चित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत सिंचन विभागांनी तत्परतेने संबंधित यंत्रणाला माहिती द्यावी. संवाद, संपर्क सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
हवामान संबंधित वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अलर्ट नागरिकांना देण्यात यावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येणाऱ्या निवारागृहात स्वच्छता असावी. पूर परिस्थिती असलेल्या गावात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्यता असते, ते पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
लहान मुले, अपंग व वृध्दांचे स्थलांतरण करतांना योग्य ती काळजी घ्यावी. आपत्ती काळात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या लोकांशी संपर्क करावा. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्यात.