‘टाईम्स लीडिंग लाईट’ कार्यक्रम
नागपूर: कोविड संक्रमणाच्या काळात शहरात रुग्णशय्या, ऑक्सीजन खूप अडचण होती. त्यावेळी रुग्णशय्यांमध्ये वाढ करण्यापासून ऑक्सीजन उपलब्धतेपर्यंत सर्व प्रयत्न करून जीव वाचविणे महत्त्वाचे होते. लोकांमध्ये आक्रोश होता. अशा संकटाच्या काळात डॉक्टर, सुरक्षा रक्षक, पॅरामेडिकल कर्मचारी, पोलिस यांनी मोलाचे सहकार्य केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘टाईम्स लीडिंग लाईट’ या कार्यक्रमात त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. या उपस्थित होत्या. कोविडचे संक्रमण काळात 250 टन ऑक्सीजनची गरज असताना फक्त 86 टन ऑक्सीजन उपलब्ध होता. विविध ठिकाणांहून ऑक्सीजनची व्यवस्था करावी लागली. हवेतून ऑक्सीजन बनविणारे प्रकल्प निर्माण करण्याची गरज भासली. ऑक्सीजनमध्ये आपण स्वयंपूर्ण होण्याचे ठरविले, असेही ते म्हणाले.
रुग्णशय्या वाढविण्यासाठी नवीन हॉस्पिटल सुरु करण्याची कल्पना समोर आली. पण त्यापेक्षा विद्यमान हॉस्पिटलमध्येच सर्व सुविधा उपलब्ध करून रुग्णशय्या वाढविणे सोपे असल्याचे लक्षात आले. रेमडेसीवीर, अॅम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची निर्मिती सुरु करण्यात आली. आता लहान मुलांना लागणार्या औषधे निर्मितीची परवानगीही मिळवून देण्याचा प्रयत्न मी करीत असल्याचे ना. गडकरी म्हणाले.
https://fb.watch/75P20maBnA/
या दरम्यान डॉक्टरांनी उत्तम काम केले. पण काही डॉक्टरांनी जास्त पैसे घेतल्याच्या तक्रारींमुळे लोकांमध्ये असंतोष पसरला. यासाठी हॉस्पिटलचे ग्रेडेशन करून शुल्क ठरवून दिले पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- डॉक्टरांचे प्रश्नही समजून घेऊन ते सोडविले पाहिजे.
या काळातच माध्यमांचे काम अत्यंत महत्त्वाचे ठरले. तसेच 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी वृत्तपत्रांनी जनजागृती करावी. कोरोनावर प्राणायाम, आयुर्वेद, योगविज्ञान अत्यंत उपयोगी असल्याचेही सिध्द झाले आहे. यात लोकशिक्षण हे महत्त्वाचे आहे. पुढील काळात आपल्याला लागणार्या आरोग्य व्यवस्था या आपल्याच उभ्या कराव्या लागतील. तिसरी लाट येवो न येवो पण आपण पूर्ण तयारीनिशी सज्ज असले पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.